सत्ता गेली; शिवसेनेचे मोठे नेते प्रवीण राऊत यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत
बदलापूर : मुंबई महापालिकेसह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची (शिंदे गट) मर्यादित घोडदौड रोखण्यात भाजपला यश मिळाले आहे. त्याच धर्तीवर कुळगाव–बदलापूर नगरपालिकेतही शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली, ज्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदावरून शिवसेनेला पाणी सोडावे लागले असून, या सत्तांतरात आमदार किसन कथोरे यांची निर्णायक भूमिका राहिली. सत्तेचा धक्का पचवतानाच आता शिंदे गटासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. शिवसेनेतील नाराज पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली असून, लवकरच शिवसेनेचा एक महत्त्वाचा पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शिंदेसेनेला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुळगाव–बदलापूर पालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी भाजपने निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली होती. या युतीचा थेट फायदा भाजपला झाला. राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतांमुळे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे विजयी झाल्या. भाजपचे २२ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक मिळून युतीचे संख्याबळ २५ झाले, तर शिवसेना २४ जागांवरच थांबली.
यामुळे उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांवरही भाजप-राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व मिळवले. स्वीकृत नगरसेवक निवडीत शिवसेनेला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने शिवसेनेत तीव्र नाराजी पसरली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका शीतल म्हात्रे (राऊत), त्यांचे पती व शिवसेना उपशहरप्रमुख प्रवीण राऊत, तसेच पराभूत उमेदवारांनी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली होती. उपनगराध्यक्ष निवडीत शीतल राऊत व विजया राऊत या नगरसेविकांची अनुपस्थितीही गटबाजीचे संकेत देणारी ठरली होती.