वंचितचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवले
उल्हासनगर : महानगरपालिका निवडणुकीनंतर उल्हासनगरमध्ये सत्तेसाठी खऱ्या अर्थाने राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. ७८ सदस्यीय सभागृहात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात जोरदार ‘सेटींग' सुरू आहे. या सत्तानाट्यात वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांना किंगमेकरची भूमिका मिळाल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी ४० नगरसेवकांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. भाजपकडे ३७, तर शिंदे गटाच्या शिवसेना (ओमी टीम) कडे ३६ जागा आहेत. साई पक्षाच्या दीप्ती दुधानी आणि अपक्ष सविता तोरणे–रगडे या शिंदे गटाच्या महाआघाडीतील नगरसेवक असल्याने शिंदे गटाचा आकडा ३८ वर पोहोचतो. मात्र सत्तेसाठी त्यांना अद्याप २ नगरसेवकांची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीकडे विकास खरात आणि सुरेखा सोनावणे असे दोन नगरसेवक असून, हेच सध्या सत्तेचे पारडे फिरवू शकतात. वंचितचे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास, त्यांची एकूण संख्या थेट ४० वर जाणार आहे.
वंचितचे नगरसेवक गेले कुठे?
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी खळबळजनक दावा करत सांगितले की, भाजप आणि शिंदेसेनेकडून त्यांच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सत्तेसाठी विविध आमिषे दाखवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवले आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.






