सुशासनासाठी जनतेचा विक्रमी जनादेश!
देशाला आता केवळ विकास आणि 'गुड गव्हर्नन्स' हवा
दिसपुर (वृत्तसंस्था): आज भाजप संपूर्ण देशात लोकांची पहिली पसंती बनली आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, आसाम येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केले. पंतप्रधान मोदी सध्या आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काझीरंगा नॅशनल पार्क परिसरात ६,९५७ कोटींच्या ३५ किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे भूमिपूजन केले. यासोबतच त्यांनी दिब्रूगढ-गोमती नगर (लखनऊ) आणि कामाख्या-रोहतक या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज पुन्हा एकदा काझीरंगाला येण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यामुळे माझ्या मागील भेटीच्या आठवणी आपसूकच मनात येतात. दोन वर्षांपूर्वी काझीरंगात घालवलेले क्षण माझ्या आयुष्यातील अतिशय खास अनुभवांपैकी आहेत. मला काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये रात्री मुक्काम करण्याची संधी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी हत्ती सफारीदरम्यान या परिसराचे सौंदर्य अगदी जवळून अनुभवता आले. आसाममध्ये आल्यावर मला नेहमीच एक वेगळाच आनंद मिळतो."
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, "आज भाजप संपूर्ण देशात लोकांची पहिली पसंती बनली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत भाजपवरील देशाचा विश्वास सातत्याने वाढत आहे. अलीकडे बिहारमध्ये निवडणुका झाल्या, तेथे २० वर्षांनंतरही जनतेने भाजपला विक्रमी मते दिली आणि विक्रमी जागा जिंकून दिल्या. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल लागले असून, तेथेही जनतेने पहिल्यांदाच भाजपला विक्रमी जनादेश दिला आहे. केरळच्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपला मोठा पाठिंबा मिळाला आणि तिरुवनंतपुरममध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडून आला आहे. या सर्व निकालांमधून स्पष्ट होते की आज देशाला चांगले शासन (गुड गव्हर्नन्स) आणि विकास हवा आहे."
विजय मुंबईत अन् जल्लोष काझीरंगात... दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मुंबईतील लोकांनी भाजपला विक्रमी जनादेश दिला. विजय मुंबईत होत आहे आणि जल्लोष काझीरंगामध्ये होत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील लोकांनी भाजपला सेवा करण्याची संधी दिली आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आसाममधील कालियाबोर येथे एका जाहीर सभेत बोलत होते.






