विनाशकाले विपरीत बुद्धी

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर


मानवी जीवनात बुद्धी ही सर्वात मोठी शक्ती मानली जाते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी; परंतु जेव्हा माणूस संकटाच्या किंवा विनाशाच्या दिशेने जात असतो, तेव्हा त्याची बुद्धी योग्य निर्णय घेण्याऐवजी उलट दिशेने काम करू लागते. अशा अवस्थेला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे म्हटले जाते. विनाश जवळ आला की माणसाची विचारशक्ती मंदावते. त्याला चांगले-वाईट यातील फरक समजत नाही. योग्य सल्ला असूनही तो नाकारला जातो आणि चुकीच्या निर्णयावर हट्ट धरला जातो. अहंकार, अति आत्मविश्वास, राग, लोभ आणि भीती या भावनांमुळे बुद्धीवर पडदा पडतो.


दैनंदिन जीवनात याची अनेक उदाहरणे दिसतात. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून करमणुकीत वेळ घालवतो, नंतर अपयश येते. कर्मचारी वरिष्ठांचा योग्य सल्ला न ऐकता चुकीचा निर्णय घेतो आणि नुकसान होते. कुटुंबात किंवा नात्यांमध्ये संवाद न करता गैरसमज वाढवले जातात आणि नाती तुटतात. या सर्व ठिकाणी विनाशाचे कारण विपरीत बुद्धी ठरते. ही अवस्था टाळण्यासाठी माणसाने आत्मपरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. निर्णय घेताना घाई न करता शांतपणे विचार करावा. अनुभवी आणि विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्यावा व तो मनापासून स्वीकारावा. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी ठेवावी, कारण चुका मान्य करणे ही कमजोरी नसून शहाणपणाची खूण आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि निर्णयांचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विनाश टाळायचा असेल तर विवेक, संयम आणि नम्रता अंगी बाणवली पाहिजे. योग्य वेळी योग्य विचार केला, तर ‘विपरीत बुद्धी’ जागा घेत नाही. म्हणूनच माणसाने सदैव सतर्क राहून बुद्धीचा योग्य उपयोग करावा.


ही स्थिती कधी दिसून येते? •
अहंकार, अति आत्मविश्वास वाढतो, योग्य सल्ला नाकारला जातो,• राग, मत्सर, भीती किंवा लोभ यांचा प्रभाव वाढतो, अनुभवातून शिकण्याऐवजी हट्ट धरला जातो, तात्कालिक फायद्याचा विचार करून दीर्घकालीन नुकसान केले जाते.
दैनंदिन जीवनातील उदाहरणे
विद्यार्थी : अभ्यासाऐवजी मोबाइल/मनोरंजनाला जास्त महत्त्व देतात.
कर्मचारी : चुकी असूनही वरिष्ठांचा सल्ला मानत नाहीत.
नाती : गैरसमज वाढवून संवाद टाळणे
ही अवस्था टाळण्यासाठी
१. आत्मपरीक्षण करा – निर्णय घेताना शांतपणे विचार करा.
२. योग्य सल्ला घ्या – अनुभवी, विश्वासू व्यक्तींचे मत ऐका.
३. अहंकार टाळा – चुका मान्य करणे ही कमजोरी नसून शहाणपण आहे.
४. भावनांवर नियंत्रण ठेवा – रागात किंवा घाईत निर्णय घेऊ नका.
५. परिणामांचा विचार करा
– आजचा निर्णय उद्यावर कसा
परिणाम करेल हे पाहा.
६. शिकण्याची वृत्ती ठेवा –
अपयशातून धडा घ्या.
एक उपाशी उंदीर अन्नाच्या शोधात
स्वयंपाकघरात इकडे-तिकडे भटकत होता. तेवढ्यात त्याला समोर खाऊचा डबा दिसला. मनोमन खूप खूश होऊन तो डब्याकडे धावला. डब्यात शिरावे कसे असा विचार करू लागला.
इतक्यात त्याला डब्याला एक छोटसं भोक असल्याचं दिसलं. उंदीर भुकेला होता, त्यामुळे तो रोड दिसत होता, पोट पाठीस चिकटलेलं होतं. तो सरळ आत घुसला. आतील लाडू, शंकरपाळे पाहून उंदीर बेहद्द खूश झाला. काय खावं आणि किती खावं असं त्याला झालं. तो खाऊवर तुटून पडला. हे सगळं त्याचा दुसरा मित्र बघत होता. त्याने त्याला सल्ला दिला, ‘बाबा रे जरा जपून खा. इतका हव्यास बरा नाही. नाहीतर त्रासच होईल.’
उंदराने त्याच्या म्हणण्याकडे कानाडोळा केला. तो खातच राहिला. जेव्हा पोट टम्म फुगलं, तेव्हा नाईलाजाने त्याने खाणे बंद केलं. आता तो बाहेर पडण्यास धडपडू लागला; परंतु भोक लहान आणि खाऊ खाऊन टम्म फुगल्याने उंदराला बाहेर पडता येईना. थोड्याच वेळात घरात माणसांची वर्दळ सुरू झाल्यामुळे उंदीर बाहेर पडण्यासाठी जोरात प्रयत्न करू लागला. जोर करून तो भोकात शिरला; पण पोट इतकं फुगलं होतं की, तो मध्येच अडकला. त्याला मागे-पुढे हालचाल करता येईना. तो ओरडू लागला.
उंदराचा आवाज ऐकून चुलीजवळ बसलेल्या मांजराची नजर डब्याकडे गेली. आज आपणास चांगली मेजवानी मिळणार या आनंदात ती धावत सुटली. तडक डब्याकडे जाऊन एका पंजात तिने उंदराला बाहेर काढले आणि त्याचा पार
चट्टा-मट्टा केला.
तात्पर्य : अति स्वार्थ – सारा अनर्थ.
विचार : कोणतेही काम करताना त्याच्या परिणामाचा विचार करणे यातच शहाणपणा असतो.

Comments
Add Comment

स्वतःला प्राधान्य द्या...

मनस्वीनी,पूर्णिमा शिंदे  स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या

स्मृती

जीवनगंध,पूनम राणे गुरुपौर्णिमेचं निमित्त होतं. विविध रंगांच्या फुलांनी हॉल सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाई

ताणविरहित शिक्षण

नक्षत्रांचे देणे,डॉ. विजया वाड सगळे पालक तिच्या वर्गाचा आग्रह धरीत. ‘का? तिचाच वर्ग का?’ ‘अहो, आमच्या बाळूचाच तसा

सतर्कता

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ हल्ली तसंही रात्री उशिरापर्यंत कोणाला झोप येत नाही. त्यातही वृद्ध असतील तर झोप

सुरक्षित फांदी

कथा,रमेश तांबे  एकदा एक शेठजी एका जंगलात फिरायला गेले होते. जंगल अतिशय घनदाट होते. फिरता फिरता त्यांना एका झाडावर

ढग कसे चमकतात?

कथा ,प्रा. देवबा पाटील नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपला शाळेचा गृहपाठ व अभ्यास आटोपल्यावर सीता व नीता मावशीजवळ