नवी मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी केवळ १ रुपया प्रति चौ.मी. दराने ३.६ एकर भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा भूखंड उलवे नोड, सेक्टर १२ येथे असून, याबाबतचा प्राथमिक निर्णय २९ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला होता. तेव्हा सरकारने सिडकोच्या भूमूल्य व भूविनियोग धोरणानुसार भूखंडाची किंमत आकारण्याचा निर्णय घेतला होता. तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डाने व्यंकटेश्वरा मंदिरासाठी मिळालेल्या भूखंडाप्रमाणेच पद्मावती अम्मावरी मंदिरासाठीही नाममात्र दराने भूखंड देण्याची आणि इतर शुल्क व सेवा कर माफ करण्याची मागणी सिडकोकडे केली होती. सिडकोच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. उलवे येथे मंदिर उभारल्यास पर्यटनाला चालना, परिसराला धार्मिक–सामाजिक महत्त्व आणि स्थानिक विकासाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. तसेच देवस्थानाच्या माध्यमातून परिसरात विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.






