मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील सर्वात मोठ्या विमानसेवा कंपन्यांपैकी एक इंडिगो एअरलाइन्सवर डीजीसीएने मोठी कारवाई केली आहे. मागील महिन्यात इंडिगोने अचानक हजारो उड्डाणे रद्द केली होती आणि शेकडो उड्डाणे विलंबाने चालवली गेली होती. या कारणामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. या प्रकरणी शनिवारी डीजीसीएने इंडिगोला २२.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्यातच डीजीसीएने इंडिगोच्या ऑपरेशनल व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पाहून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यावेळी कंपनीला त्यांच्या एकूण उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स आणि सीओओ इसिड्रे पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
इंडिगोने २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत तब्बल ५ हजारहून अधिक उड्डाणे रद्द केली होती. या रद्दउड्डाणांमुळे प्रवाशांना केवळ वेळेचीच हानी नाही तर आर्थिक आणि मानसिक ताणही सहन करावा लागला. डीजीसीएच्या अहवालानुसार, या मोठ्या प्रमाणावर रद्दउड्डाणांमुळे एअरलाइनच्या ऑपरेशनल बिघाड स्पष्ट झाला आणि प्रवाशांना मोठी गैरसोय झाली.
डीजीसीएच्या ताज्या आदेशानुसार, इंडिगोला ६८ दिवसांसाठी दररोज तीन लाख रुपयांचा दंड बसवण्यात आला आहे, तसेच कंपनीवर अतिरिक्त १.८ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यामुळे इंडिगोवर एकूण २२.२ कोटी रुपयांचा दंड झाला आहे. डीजीसीएने स्पष्ट केले आहे की ही कारवाई एअरलाइनच्या नियोजनात आणि ऑपरेशनमध्ये गंभीर दोष असल्यामुळे करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या एअरलाइनवर ही कारवाई प्रवाशांच्या हितासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या गैरसोयी टाळण्यासाठी घेतली गेली आहे.