बविआच्या २६ माजी नगरसेवकांना मतदारांची पुन्हा पसंती
विरार : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या ४३ सदस्यांपैकी ४० नगरसेवक हे पहिल्याच वेळी निवडून आले आहेत. तर बहुजन विकास आघाडी बाबत मात्र चित्र वेगळे आहे. बहुजन विकास आघाडीच्या तब्बल २९ माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा महापालिकेच्या सभागृहात पाठवले आहे. या २६ मध्ये माजी सभापती उपमहापौर आणि महापौरांचा सुद्धा समावेश आहे.
वसई विरार महापालिकेच्या यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकीमध्ये भाजपचा केवळ एकच नगरसेवक निवडून आला होता. यावेळी मात्र भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून तब्बल ४३ नगरसेवक निवडून आणले आहेत. यामध्ये किशोर पाटील, प्रदीप पवार आणि चंद्रकांत गोरीवले हे माजी नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे हे तीनही पदाधिकारी बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये आलेले आहेत. तर उर्वरित ४० नवनिर्वाचित नगरसेवक हे पहिल्याच वेळी महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत. भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस अपर्णा पाटील, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक शेळके वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, जयप्रकाश वझे ,निलेश चौधरी असे अनेक भाजपचे संघटनेतील पदाधिकारी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर बहुजन विकास आघाडीने निवडणूक रिंगणात उतरविलेल्या ३७ नगरसेवकांपैकी २६ नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. यामध्ये अजिव पाटील, प्रफुल साने, सुमन दुर्गेश ,नरेंद्र पाटील, झीनत जाहिदी, सदानंद पाटील, संगीता भेरे ,प्रशांत राऊत, पंकज पाटील, सचिन देसाई ,निलेश देशमुख, रंजना थालेकर, मार्शल लोपिस, अतुल साळुंखे ,रमेश गोरखाना, कल्पेश मानकर, पुष्पा जाधव, पंकज चोरघे, लॉरेल डायस, प्रकाश रॉड्रिग्ज ,सुनील आचोळकर ,कन्हैया भोईर, ज्योती धोंडेकर ,प्रवीण शेट्टी, अलका गमज्या आणि आफिक शेख यांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता राहणार असून, विरोधकांकडे सुद्धा चांगले संख्याबळ असल्याने महापालिकेच्या सभागृहात अनेक विषयांवर वादळी चर्चा वसई विरारकरांना अनुभवायला मिळणार आहे.






