मोहित सोमण: एनएसई (National Stock Exchange NSE) प्रसिद्ध केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, रविवार १६ जानेवारी २०२६ या वार्षिक अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार विशेष ट्रेडिंगसाठी खुला असणार आहे. एनएसईने गुंतवणूकदारांसाठी या विशेष सत्राचे आयोजन केले असून अर्थसंकल्पातून शेअर बाजारातील औत्सुक्याची येणारी तेजी ट्रेडिंगमध्ये परावर्तित करण्यासाठी हे आयोजन केले जात असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी आयोजित केला असताना शेअर बाजारानेही आपले दरवाजे गुंतवणूकदारांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध माहितीनुसार, प्री ओपन सत्र त्या दिवशी नेहमीप्रमाणेच ९ वाजता सकाळी सुरु होणार असून ९.०८ वाजेपर्यंत ते संपेल तर सर्वसाधारण ट्रेडिंगची वेळ सकाळी ९.१५ वाजेपासून दुपारी ३.२० वाजेपर्यंत असेल. तर आपल्या व्यवहारातील तांत्रिक बदल (Modification) करण्यासाठी ४.१५ वाजेपर्यंत मुदत दिली गेली आहे.
गेल्या आठवड्यात, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ साठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत (विधानमंडळ असलेल्या) अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. आत्मनिर्भर आणि विकसित भारताची संकल्पना पुढे नेण्यासाठी देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे हे अर्थसंकल्पाचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य देण्यात येणार आहे असे सांगितले जात आहे. त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) बळकट करणे आणि कर व अनुपालन (Tax and Compliance) प्रणाली सुलभ करणे याला प्राधान्य देण्यात आले. विशेष म्हणजे,आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ च्या तयारीचा भाग म्हणून अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलतीच्या १० फेऱ्या घेतल्या आहेत.यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले होते. निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली हा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.






