मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. दुसरीकडे उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या आघाडीने ७० हून अधिक जागांवर विजय मिळवला असून विरोधी बाकांवरही मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.
मुंबईत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेने २९ जागा जिंकत सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निकालानंतर आता मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
महापौरपदाबाबत शिवसेनेतील काही नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली होती. यावर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणताही वाद होणार नसल्याचे स्पष्ट केले. महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महापौरपदाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. महापौर कोण असेल, किती काळासाठी असेल आणि सत्तेचे नियोजन कसे असेल, याचा निर्णय परस्पर समन्वयातून घेतला जाईल. कोणताही संघर्ष न करता दोन्ही पक्ष एकत्रितपणे मुंबईचे प्रशासन सक्षमपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.






