मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू राहणाऱ्या या शुभपर्वाच्या काळातच नव्हे, तर दैनंदिन जीवनातही गोडव्याचा अनुभव देणारे क्षण अनेकदा समोर येत असतात. मकरसंक्रांतीचे औचित्य साधत, खास 'राजरंग' कॉलमसाठी, रंगभूमीवरच्या आघाडीच्या दोन अभिनेत्रींनी केलेल्या अशाच काही आठवणीतल्या गोड क्षणांची ही पखरण...! यातून 'आई'पणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होताना दिसते, हे विशेष...!
'त्याची' आई असण्यातला गोडवा... - शृजा प्रभुदेसाई (अभिनेत्री)
देवाच्या कृपेने आयुष्यात गोडवा देणारे क्षण बरेच येऊन गेले आहेत. काही क्षण असे असतात की जे आपण कधीच विसरू शकत नाही. माझा मुलगा जेव्हा शाळेत जायला लागला; तेव्हाची ही आठवण आहे. तो इंग्लिश शाळेमध्ये जात होता; पण कसे काय माहीत नाही, त्याला मराठी अक्षरे यायला लागली होती. तो त्याप्रमाणे शाळेत जाऊन एका कागदावर माझ्यासाठी काही लिहून आणायचा; म्हणजे त्याच्यात सुसंगती अशी नसायची. आता 'आई' हा शब्द आहे; तर 'आ' आणि 'ई'मध्ये जागा असायची. 'आई मला तू खूप आवडतेस' असे वाक्य लिहिताना 'मला'मधला 'म' हा 'ला'पासून खूप लांब गेलेला असायचा. जवळजवळ आठ-दहा वेळा त्याने असे शाळेतून लिहून आणले होते. ते मला फार आवडायचे आणि माझ्या आयुष्यात मोठा गोडवा देणारी ही आठवण आहे. मला ते आत्ता आठवले तरी सुद्धा खूप छान वाटते.
लहान मुलांचे विश्व हे फक्त आई हेच असते. शाळेत गेल्यावरही त्यांना आईची आठवण येत असते. त्यांचे संपूर्ण जग म्हणजे आई असते. तर माझ्या मुलाची 'ती' आठवण मला आजही सुखावून जाणारी गोष्ट आहे. आम्ही काही त्याला असे लिहायला वगैरे शिकवले नव्हते. पण त्याचे ते तसे व्यक्त होणे, ही खूप मोठी गोष्ट होती आणि माझ्या आयुष्यातला तो गोडवाच होता. असे अनेक गोड क्षण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात आले. जेव्हा आपण आई होतो; तेव्हा आपला सगळा दृष्टिकोन बदलून आपण मुलांच्या दृष्टीने आयुष्य बघायला लागतो. जेव्हा आपल्याला त्यांच्यातले काहीतरी पटते, समजते, आवडते; तेव्हा ते क्षण फार गोड असतात. मात्र ते इतक्या भुर्रकन उडून निघून जातात की ते क्षण हवेहवेसे वाटत राहतात. त्यात एवढा गोडवा वाटण्याचे कारण म्हणजे जी गोष्ट थोड्याच प्रमाणात किंवा थोडक्यात मिळते; त्याचा गोडवा अजूनच खास असतो.
आता अलीकडच्या काळातला गोडवा सांगायचा तर नाटकाच्या प्रयोगांविषयीचा आहे. ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग असतो, तेव्हा असे कुठेतरी वाटते की प्रयोग छान झाला आणि प्रेक्षकांना प्रयोग खूप आवडला. त्यांच्या चेहऱ्यांवर दिसते की ते किती एकरूप झाले होते नाटकाशी किंवा त्यांना आपण आनंद देऊ शकलो किंवा त्यांनी आपल्यासाठी दिलेला वेळ आपण सत्कारणी लावला. या सगळ्याचा एक वेगळाच गोडवा अनुभवायला मिळतो. यावर्षी 'सुंदर मी होणार' आणि आता 'हिमालयाची सावली' नाटकाच्या प्रयोगांच्या वेळी सुद्धा या गोडव्याचा आस्वाद मला खूप वेळा घ्यायला मिळाला. असेच गोडव्याचे क्षण आयुष्यात सदैव येत राहू देत, हीच इच्छा आहे.
'तिची' आई असण्यातला गोडवा... - दीप्ती भागवत (अभिनेत्री)
आयुष्यात घडलेली गोड, आनंदी घटना सांगायची तर माझ्या बाबतीत घडलेले असे दोन-तीन खूप छान प्रसंग आहेत. एक म्हणजे मी पुन्हा एकदा, एका खूप छान टीमसोबत नाटकात काम करत आहे आणि हे नाटक म्हणजे 'अ परफेक्ट मर्डर'. या नाटकाची पूर्ण टीम इतकी छान आहे की त्यांच्याबरोबर काम करणे हा एक स्वतंत्र अनुभव आहे आणि त्यांच्यासह स्टेज शेअर करणे ही माझ्यासाठी खूप गोड आठवण आहे. अलीकडेच असे झाले की मी दोन अप्रतिम कार्यक्रम केले. ७०-८० चे दशक ज्यांनी गाजवले ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ आणि निवेदिता ताई या दोघांबरोबर एका कार्यक्रमामध्ये मी होते आणि लगेचच पुढच्या आठवड्यात सचिन व सुप्रिया पिळगावकर यांची सुद्धा मला मुलाखत घेता आली. त्यामुळे त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ त्या मुलाखतीतून जाणून घेता येणे, ही माझ्यासाठी खूप गोड आठवण आहे.
वर्तमानातला एक गोड प्रसंग किंवा गोड आठवण सांगायची तर ती माझ्या खूप जवळची आहे. मला स्वतःला एक अभिनेत्री म्हणून ओळखतात तेव्हा छान वाटतेच; पण आता एका नवोदित, गुणी अभिनेत्रीची आई म्हणून जेव्हा माझ्याकडे पाहिले जाते; तेव्हा ती भावना खूप गोड असते. मध्यंतरी माझा एक कार्यक्रम होता आणि तो संपल्यावर एक जोडपे मला भेटायला आले होते. त्यातली जी माझी मैत्रीण होती, ती मला म्हणाली की "कार्यक्रम तर छान झाला, पण मला एक सांग, 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेतली मुलगी तुझीच मुलगी आहे का? आम्हाला ती खूप आवडते". त्याक्षणी मला ते खूप अनपेक्षित होते. कारण माझ्या कार्यक्रमाचा विषय वेगळा होता. पण त्यांनी माझी मुलगी, 'जुई'बद्दलची कॉम्प्लिमेंट तिच्या आईला म्हणजे मला दिली. आत्ताच १ जानेवारीला म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुईचा एक फार सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला; त्या चित्रपटाचे नाव 'मॅजिक'. या चित्रपटात जुईचा छान अभिनय पाहणे, तिला अनुभवणे ही माझ्यासाठी खूप गोड अशी आठवण होती.