भाजपच्या ‘विजय मेळाव्या’त खासदार नारायण राणे यांची घोषणा
कणकवली (प्रतिनिधी): राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दिली.
कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आ. प्रमोद जठार, माजी आ. अजित गोगटे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते आदी उपस्थित होते. राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महायुतीची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई महानगरपालिका निकालानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून विरोधकांचा धुव्वा उडवला जाईल, असा इशाराही खा. नारायण राणे यांनी दिला आहे.
खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार निवडणूक - महायुतीच्या बैठकीत निर्णय
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, महायुतीची निवडणूकविषयक बैठक पार पडली असून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.






