Saturday, January 17, 2026

संत भावंडीबाई

आईबापा पोटी कन्या हो जन्मता आईबापा पोटी कन्या हो जन्मता खिन्न वाटे चित्ता सर्व जना | परंतु कन्येचे महत्व हो थोर करिती उद्धार सुकन्या जी | सुकन्या म्हणजे असे सुवर्तन मनी समाधान सर्वकाळ| भावंडी ही म्हणे पतिव्रतपणे वागुनिया धन्य होती जगी |

- डॉ. देवीदास पोटे

भावंडीबाई या मराठी वीरशैव परंपरेतील संत कवयित्री. विरक्त परंपरेतील गुरुदास यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांचा काळ प्रबोधनकारी परिवर्तनाचा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाबींचा समाजमनाला परिचय होत होता. मात्र या सुधारणावादी परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगवाणीत दिसत नाही. त्यांना दीक्षा देताना गुरूंनी अशी अट घातली की तीन वर्षे त्यांनी परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. भावंबाईंनी ही अट शेवटपर्यंत पाळली.

मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात होणाऱ्या नकारात्मक परिणांमाचे वर्णन या अभंगात केले आहे. खरं तर कन्या माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. आपल्या चांगल्या वागण्याने सर्वांना समाधान देते. पतिव्रतेचे व्रत स्वीकारून जगात धन्य होते. भावंडीबाईंनी मुलीच्या जन्माचे श्रेष्ठत्व या अभंगात वर्णिले आहे. आजच्या वर्तमान काळातही हे प्रबोधन आवश्यक आहे. कारण मुलीबाबतची मानसिकता आजही समाजातून गेलेली नाही.

भावंडीबाईंचा जन्मकाळ इ. स. १८८८ चा. हा काळ आधुनिक आहे. पण त्यांची अभंगवाणी मात्र मध्ययुगीन विचारांचे प्रकटीकरण करणारी आहे. गुरूंनी तीन वर्षे परपुरुषाचे मुखावलोकन करू नये अशी अट घालून मंत्रदीक्षा दिली.

भावंडीबाई ही वैराग्यशील. तिने ही अट काटेकोरपणे पाळली. तिचा भाऊही पतिव्रत्याबाबत तिच्यावर संशय घेत असे. यावर इतर परकेजणांनी तिला किती छळले असेल याची कल्पनाही करवत नाही.

भावंडीबाईंनी सुमारे सातशे अभंगांची रचना केली आहे. त्या संत असल्या तरी प्रथम स्त्री आहेत. त्यात त्या विधवा आहेत. अध्यात्माच्या वाटेवर चालताना आयुष्याची झालेली परवड त्या कधी स्पष्टपणे तर कधी सुचकतेने व्यक्त करतात. म्हणूनच ‘स्त्री देह जीवा घडल्याकारणे| सदगुरू चरण अंतरले ||’ किंवा ‘स्त्री शरीराचा मना वाटे त्रास | न घडे काही अभ्यास एक ||’ असे उद्गार त्यांच्या अभंगवाणीत येतात.

Comments
Add Comment