मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद वर्चस्व गाजवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
युतीचा धमाका आणि विरोधकांचे अपयश
मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. या युतीने महापालिकेत जोरदार 'धमाका' केला. भाजपच्या ८९ जागांसोबतच शिंदे गटाचे २९ उमेदवार निवडून आले असून, या विजयामुळे मुंबईच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते, मात्र मतदारांनी त्यांच्या युतीला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. ठाकरे बंधूंना या निवडणुकीत मोठी कमाल दाखवता आली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक ठिकाणी भाजप-शिंदे गटाची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला असून, शरद पवारांशी हातमिळवणी करूनही त्यांना मतदारांना आकर्षित करता आले नाही.
मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्याचे संकेत मिळत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचे संरक्षण करण्यासाठी आणि संभाव्य फोडाफोडी रोखण्यासाठी त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना एका सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचा आनंद साजरा करण्याऐवजी आता नगरसेवकांना पुढील ३ दिवस हॉटेलमध्ये राहावे लागणार आहे.
बांद्राच्या 'ताज लँड्स एंड'मध्ये मुक्काम
मिळालेल्या माहितीनुसार, निवडून आलेल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील प्रतिष्ठित 'ताज लँड्स एंड' या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या ३ दिवसांच्या मुक्कामादरम्यान केवळ नगरसेवकांचे संरक्षणच केले जाणार नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. आगामी सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत आपली भूमिका काय असावी आणि पक्षीय शिस्त कशी पाळावी, याबद्दलचे मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कडक सुरक्षा आणि राजकीय गणिते
या हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. हॉटेलच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आपला एकही नगरसेवक विरोधी गटाच्या संपर्कात येऊ नये किंवा फुटू नये, याची पुरेपूर खबरदारी शिंदे गटाकडून घेतली जात आहे. या 'कडक पहारा' पद्धतीच्या राजकारणामुळे सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.






