Saturday, January 17, 2026

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई
नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत व्यापाऱ्यांची पळापळ उडवून दिली आहे. शनिवारी पहाटेपासून आयकर विभागाच्या पथकाने नागपुरातील सुपारी व्यापाराशी संबंधित 20 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुपारीच्या कथित बेकायदेशीर व्यापारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या काही नामांकित व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राजू अण्णा उर्फ राजेश शिनॉय, अलताफ कलीवाला, आसिफ कलीवाला, गनी कलीवाला यांच्यासह काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यापाऱ्यांचे मुंबईतील सुपारी व्यापारी फारूक भाई यांच्याशी कथित आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा असून, त्याच अनुषंगाने आयकर विभागाने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सकाळपासून आयकर विभागाची मोठी टीम शांतिनगर, कामठी रोड, कळमना परिसर आणि मां उमिया इंडस्ट्रियल एरिया येथे सक्रिय होती. राजू अण्णा यांच्या निवासस्थानासह कलीवाला बंधूंची कार्यालये व गोदामांमध्ये सखोल तपास करण्यात आला. याशिवाय इतवारी आणि जागनाथ बुधवारी परिसरातील सुपारी व्यापाराशी संबंधित दुकानांवरही आयकर पथकाने धडक दिली. या छाप्यांदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एके-47 शस्त्रांनी सज्ज सुरक्षा कर्मचारी आणि डॉग स्क्वॉडच्या उपस्थितीमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती. नागपूर हे मध्य भारतातील सुपारी व्यापाराचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथून मोठ्या प्रमाणावर सुपारीचा पुरवठा विविध राज्यांमध्ये केला जातो, ज्यामध्ये तंबाखू, मावा आणि गुटख्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचा समावेश असल्याचा संशय आहे. आयकर विभागाला या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि काळ्या पैशाचा व्यवहार झाल्याचा संशय आहे. मात्र, छाप्यांमध्ये नेमके काय निष्पन्न झाले याबाबत आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईचे खरे स्वरूप समोर येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागपूरच्या व्यापारी क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा