Saturday, January 17, 2026

माझ्या सासूबाई , खूप चांगली मैत्रीण

माझ्या सासूबाई , खूप चांगली मैत्रीण

युवराज अवसरमल, टर्निंग पॉइंट

प्रार्थना बेहेरे या अभिनेत्रीने मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. तिने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 'अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?' हा तिचा नवीन चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे काही दिवसात समजेल.

प्रार्थनाचा जन्म बडोद्याचा. तिचे शालेय शिक्षण बडोद्याच्या न्यू इरा शाळेत इंग्रजी माध्यमातून झाले. शाळेत असताना तिने सांस्कृतिक कार्यक्रमात फारसा सहभाग घेतला नाही, त्यातल्या त्यात नृत्याच्या कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. ती गरबा खेळायची. ती भरतनाट्यम विशारद आहे. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीमधून तिने स्टॅस्टिस्टिकमधून बी. एस्सी. केले. पुढील पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तिने मुंबई गाठली. मुंबईतील के. सी. कॉलेजमधून तिने मास मीडिया जर्नालिझम केले. नंतर ती रिपोर्टर म्हणून स्टार न्यूज चॅनेलसाठी काम करू लागली. या अगोदर तिने अभिनेत्री रेणुका शहाणेकडे 'रिटा' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. रेणुकाने देखील तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला होता. प्रार्थनाच्या एका मित्राने तिचे फोटो शूट केले होते. ते फोटो तिने बालाजीच्या ऑफिसमध्ये दिले होते. तेव्हा तिला 'पवित्र रिश्ता' ही मालिका मिळाली. त्या मालिकेमध्ये अंकिता लोखंडेची लहान बहीण वैशालीची भूमिका तिने केली होती. 'जय महाराष्ट्र भटिंडा' हा चित्रपट तिला मिळाला. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका तिला मिळाली. ती मालिका खूप गाजली. त्यामध्ये श्रेयस तळपदे होता. ती तिची पहिली मालिका होती. एकल आईपणाचा ( सिंगल मदर) विषय प्रेक्षकांना खूप भावला होता.

'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा चित्रपट कसा मिळाला असे विचारल्यावर प्रार्थना म्हणाली की मी सर्वप्रथम दिग्दर्शक केदार शिंदेला भेटले. त्यावेळी ते कलर्स वाहिनीवरील सिरीज करीत होते. मी व सुकन्यानी त्यातला एक एपिसोड केला होता. त्यावेळी केदार म्हणाले होते आपण एकत्र काम करू. यावेळी त्यांनी मला या चित्रपटाची कथा सांगितली, मला चित्रपटाची कथा खूप आवडली. त्यांना मी म्हणाले होते, की जर मला तुम्ही या चित्रपटात घेतले तर मी माझे शंभर टक्के योगदान देईन आणि त्यांनी मला या चित्रपटात घेतले व मी माझे शंभर टक्के योगदान दिले आहे.

या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली, की या चित्रपटात मी मनस्वी देसाई नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. देसाई कुटुंबात चौघे एकत्र राहत असतात. मी सुनेची भूमिका साकारली आहे, तर निर्मिती सावंत यांनी माझ्या सासूची भूमिका साकारली आहे. सासू-सुनेमध्ये काही बाबतीत पटत नाही, मग आमच्यात भांडणे होतात. एक वेळ अशी येते की आमच्यातील नात घट्ट होतं. मग पुढे काय होतं? हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहता येईल.

दिग्दर्शक केदार शिंदे व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्यासोबत काम करण्याचा कसा अनुभव होता असे विचारल्यावर प्रार्थना म्हणाली, की केदार शिंदे सोबत काम करणे म्हणजे कमाल आहे.

मी पहिल्यांदाच अशा दिग्दर्शकासोबत काम करीत आहे. त्यांना कोणता शॉट घ्यायचा हे सर्व माहीत होते. व्यक्ती म्हणून देखील ते ग्रेट आहेतच. निर्मिती ताई तर अभिनयामध्ये ग्रेट आहेत. त्या सेटवर आल्यावर इतर जण घाबरतात. माझा त्यांच्या बरोबर सीन होता, त्या वेळी मी ब्लँक झाले होते; परंतु त्यांनी मला सांभाळून घेतले.

या चित्रपटामध्ये तुमचं तुमच्या सासूबाईंशी पटत नाही असे दाखविले आहे, तर वास्तविक जीवनात तुमचं तुमच्या सासूबाईशी कसं नातं आहे, असे विचारल्यावर ती म्हणाली की आपलं काही वेळा खऱ्या आईशी पटत नाही, तर सासूबाईंशी काही वेळा तसे होऊ शकते. माणसांना एकमेकांचा स्वभाव कळाला की ते एकमेकांना समजून घेतात. माझ्या सासूबाईंचे मी कौतुक करेन कारण त्यांनी मला समजून घेतले आहे. माझ्या व्यवसायाचा त्यांना अंदाज आहे. उलट त्या मला प्रोत्साहन देतात. माझ्या सासूबाई माझी खूप चांगली मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे.

सासू-सुनेमध्ये केवळ भांडण नसून त्यांच्यात एक असाही भावनिक बंध असतो, जो या नात्याची वीण कधीच सैल होऊ देत नाही. अशाच काहीशा भावना मांडणारा आणि या नात्याचे नवे पैलू उलगडणारा हा चित्रपट आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

Comments
Add Comment