Saturday, January 17, 2026

महाराष्ट्र भाजपचा! २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा

महाराष्ट्र भाजपचा! २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा झेंडा

मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधूंसह पवार काका-पुतण्याला दणका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीबाबत एक्झिट पोल्सनी वर्तवलेले अंदाज बव्हंशी खरे ठरले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने या निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल २५ महापालिकांवर महायुतीने सत्ता मिळवत ठाकरे बंधूंसह पवार काका- पुतण्याला दणका दिला. भाजपने १६ ठिकाणी, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ९ ठिकाणी विजयी झाले आहेत. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा दबदबा ठळकपणे दिसून आला.

राजधानी मुंबईत महायुतीने निर्णायक आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप ९० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेनेला २८ जागा मिळाल्या आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या उबाठा गटाला ५७, तर राज ठाकरेंच्या मनसेला ९ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला अनपेक्षित १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची स्थिती मर्यादित दिसून आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, पुनर्विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या मुद्द्यांवर मुंबईकरांनी विश्वास दाखवला असून, बहुपक्षीय लढतीतही महायुतीने बाजी मारली आहे.

ठाणे महापालिकेत शिवसेनेने ५५, तर भाजपने २५ जागा जिंकत सत्तेवर पकड मजबूत केली आहे. नवी मुंबईत भाजपने ६६ जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या ठिकाणी शिवसेनेला ४२ जागा मिळाल्या. मीरा-भाईंदरमध्ये भाजपने ७४ जागांसह एकहाती सत्ता मिळवली, तर शिवसेना आणि इतर पक्ष पिछाडीवर राहिले. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (५१) आणि भाजप (४८) यांनी मिळून महायुतीचा किल्ला अबाधित ठेवला. उल्हासनगरमध्ये भाजप (३८) आणि शिवसेना (३६) यांची सरशी झाली, तर भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून पुढे आहे.

हितेंद्र ठाकुरांनी गड राखला : पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिकेत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. येथे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने ७१ जागा जिंकत सत्ता कायम राखली, तर भाजपला ४३ जागांवर समाधान मानावे लागले. रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेत भाजपने ६० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधांचा फायदा महायुतीला झाला.

महाराष्ट्राचे आभार !

राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत! विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.

विकासाच्या दिशेने निवडणूक लढवली

वर्षानुवर्षे भाजप कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी झोकून देऊन काम केले. त्याग व समर्पण भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टीची विचारधारा तळागाळात पोहोचवली. हा विजय सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप कार्याध्यक्ष नितीन नबीन, जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढली. भावनिक आवाहनांना जनता भुलत नाही. भाजपने विकासाच्या दिशेने निवडणूक लढवली. मतदारांचे आशीर्वाद लाभले, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.

ठाकरेंचे राजकारण अस्ताला : नितेश राणे

"उबाठाने मुंबईला आपली खासगी मालमत्ता समजले होते; परंतु मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. ही तर केवळ सुरुवात आहे, ठाकरेंच्या राजकारणाचा अस्त आता निश्चित आहे", असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी केला. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीने दमदार कामगिरी केल्यानंतर राणे यांनी मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी मुंबईला आपली खासगी मालमत्ता समजले होते. पण मुंबईकरांनी आज त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा गड सांभाळता आला नाही, ते मुंबई काय सांभाळणार? 'पेग्विन' सेना आता फक्त इतिहासात उरेल. मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे दिवस आता संपले आहेत." राणे पुढे म्हणाले की, "उबाठाने केवळ मातोश्रीच्या खिडकीतून राजकारण केले. पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने मैदानात उतरून काम केले. ही तर केवळ सुरुवात आहे, ठाकरेंच्या राजकारणाचा अस्त आता निश्चित आहे", असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.

पुणे, पिंपरी-चिंचवड ‘कमळ’ श्रेष्ठ!

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निकालात अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर भाजपचा रोखण्यात त्यांना अपयश आले. पुण्यामध्ये ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजपने पुण्यात एकहाती सत्ता काबीज केली. भाजपचे ९६ उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे प्रमुख विरोधक असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागा मिळाल्या. तब्बल ९ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत पुण्यात दुसऱ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपच्या विजयामागे संघटनात्मक ताकद हा महत्त्वाचा घटक ठरला. बूथस्तरावर केलेली काटेकोर तयारी, कार्यकर्त्यांची मेहनत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ ठरल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांच्या निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. या निकालामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, त्यांना केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेला ६ जागा प्राप्त झाल्या आहेत. तर काँग्रेस आणि उबाठा गटाला एकही जागा मिळविता आली नाही. परिणामाने भाजपला महापालिकेत पूर्ण नियंत्रण मिळाले असून, विरोधी पक्षांना मोठी हार पत्करावी लागली आहे.

नाशिक महापालिकेत पुन्हा कमळ फुलले!

सुमारे आठ वर्षांनंतर झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ७२ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवण्याची किमया साधली आहे. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या कुशल नेतृत्वामुळे हा मोठा विजय शक्य झाला. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) २६, शिवसेना (उबाठा) १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४, काँग्रेस ३, मनसे १ तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे पक्षासमोर मोठ्या अडचणी उभ्या राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र या आव्हानांना सामोरे जात शहराध्यक्ष सुनील केदार, सुनील देसाई, नाना शिलेदार तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करत पक्षाला मोठे यश मिळवून दिले. दरम्यान, निवडणुकीच्या अवघ्या आठ दिवस आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकत प्रभावी व्यूहरचना केली.

अहिल्यानगर मनपावर महायुतीची भगवी मोहोर

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून, विधानसभा, नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजप युतीने केलेली विजयाची हॅटट्रीक असल्याची असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे- पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. अहिल्यानगर महापालिकेत ६४ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या युतीने सत्ता राखली. भाजपला २५, राष्ट्रवादीला २७ जागा मिळाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून १०जागांवर विजय प्राप्त केला. विरोधी पक्षातील काॅंग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.

कोणत्या प्रमुख महापालिकेत कोणत्या पक्षाला किती जागा?

  1. मुंबई - भाजप ८९, शिवसेना २९, उबाठा ६५, मनसे ६, काँग्रेस २४, राष्ट्रवादी अजित पवार ३, शरद पवार १, इतर १०
  2. ठाणे - शिवसेना ७५, भाजप २८, शरद पवार १२, राष्ट्रवादी अजित पवार ९, उबाठा १
  3. नवी मुंबई - भाजप ६५, शिवसेना ४२, उबाठा २, मनसे १
  4. पनवेल - भाजप ६०, शिवसेना २, राष्ट्रवादी २, उबाठा ५, काँग्रेस ४
  5. मीरा-भाईंदर - भाजप ५२ शिवसेना २, काँग्रेस ०, उबाठा ०, मनसे ०
  6. वसई-विरार - बविआ ७१, भाजप ४३, शिवसेना १, उबाठासह अन्य पक्ष ०
  7. कल्याण-डोंबिवली - शिवसेना ५४, भाजप ५०, उबाठा १०, मनसे ५, काँग्रेस २, शरद पवार १
  8. उल्हासनगर - भाजप ३७, शिवसेना ३६, काँग्रेस १
  9. भिवंडी-निजामपूर - काँग्रेस ३०, भाजप २२, शिवसेना १२, शरद पवार १२
  10. पिंपरी-चिंचवड - भाजप ८४, राष्ट्रवादी ३६, शिवसेना ६
  11. पुणे - भाजप ९६, राष्ट्रवादी २०, काँग्रेस १५, शिवसेना १
  12. नाशिक - भाजप ७२, शिवसेना २६, राष्ट्रवादी ३, उबाठा ९, मनसे १, काँग्रेस ३
  13. मालेगाव - इस्लाम पार्टी ६१,शिवसेना १८, भाजप २
  14. छत्रपती संभाजीनगर - भाजप ५७, शिवसेना १३, उबाठा ६, काँग्रेस १, शरद पवार १
  15. नागपूर - भाजप १०२, शिवसेना १, काँग्रेस ३४, राष्ट्रवादी १, उबाठा २
 
Comments
Add Comment