Saturday, January 17, 2026

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार

मुंबई : “उद्धव ठाकरेंनी आजवरच्या कार्यकाळात मुंबई पालिकेची सत्ता विरोधकांची घरे तोडण्यासाठी वापरली. ते मुख्यमंत्री असताना दररोज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना फोन करून राणेंचे घर तोडण्याच्या सूचना देत होते. ते राणेंचे घर तोडू शकले नाहीत. पण, आता मातोश्री-२ ची वेळ आहे”, असा इशारा राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दिला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

उबाठा गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. त्याविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, “ज्या शिर्केंनी छत्रपती संभाजी राजांची माहिती औरंगजेबाला दिली, त्यांच्यात आणि ठाकरे बंधूंमध्ये आणि त्यांच्या पिलावळीमध्ये काही फरक नाही. पाकिस्तानात बसलेल्या अब्बाची स्क्रीप्ट ते मुंबईत बसून वाचून दाखवत आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधूंना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. जिहाद्यांच्या मांडीला मांडी लावून, चंगेज मुलतानी, रशीद मामूची दाढी कुरवाळत हे लोक बसले होते. परंतु, हिरवी शाल पंघरणाऱ्यांना हिंदू मतदारांनी धडा शिकवला. त्यामुळे संजय राऊत यांना थोडा वेळ द्या, कालचा इफेक्ट आहे. त्यांनी बॅग पॅक करून निघावे आता”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

मुंबईतील हिंदू एकत्र आले, त्याचा परिणाम महायुतीच्या विजयात झाला. बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईतील वाढलेली संख्या कमी करण्यासाठी आम्हाला सत्ता द्या, अशी विनंती आम्ही मुंबईकर मतदारांना केली होती. आता पुढची पाच वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात या सगळ्या गोष्टी करू. अनधिकृत हिरवी चादरी असलेल्या ठिकाणी देवभाऊ यांचा बुलडोझर चालेल. परंतु, हिंदूंनी यापुढच्या निवडणुकांमध्येही विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. कारण, आपल्यात फूट पडत राहिली, तर असे ‘एमआयएम’सारखे कट्टरतावादी गळे वर काढत राहतील, असे आवाहन देखील राणे यांनी केले.

मुंबई जिहाद्यांच्या घशात जाण्यापासून वाचली

‘आय लव्ह महादेव’ विचारांचा, ‘जय श्रीराम’ म्हणणारा, हिंदू-मराठी महापौर मुंबईत बसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजनवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले. आता ‘जय श्रीराम’ म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर मुंबईच्या खुर्चीवर बसवू, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

भाजपवाले मुंबई आता अदानीच्या घशात घालतील, अशी टीका उबाठाने केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, मुंबई चंगेज मुलतानीच्या घशात घातलेली चालेल, मुंबईत बुरखेवाली महापौर बसत असेल, तेही चालेल. पण, जर अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होत असेल, तर ते यांना चालत नाही. मुंबई जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा, मुंबईच्या विकासासाला जे हातभार लावतील, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही काम करू, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >