मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम रेल्वेवर वातानुकुलित लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून, दररोज १२ अतिरिक्त एसी लोकल सेवा सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे उपनगरीय प्रवास अधिक आरामदायी आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज १०९ एसी लोकल ट्रेन धावतात, तर शनिवार आणि रविवारी ६५ एसी लोकल चालवल्या जातात. नव्या निर्णयानंतर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी एसी लोकलची एकूण संख्या १२१ इतकी होणार असून, शनिवार आणि रविवारी ही संख्या वाढून ७७ एसी लोकलपर्यंत पोहोचेल तर वाढीव १२ एसी लोकल सेवा २६ जानेवारीपासून नियमितपणे कार्यान्वित होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या लोकलपैकी आठ एसी लोकल गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. यामध्ये सकाळच्या वेळेत चार आणि संध्याकाळच्या वेळेत चार एसी लोकलचा समावेश असेल. त्यामुळे कार्यालयीन वेळेत होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नव्या सेवांमुळे काही उपनगरीय लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात किरकोळ बदल होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वाढीमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील एसी लोकल सेवांची संख्या आणखी वाढणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरही लवकरच एसी लोकल सेवांचा विस्तार करण्यात येणार असून, यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






