Saturday, January 17, 2026

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून, त्यानुषंगाने व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते आ. सुरेश खाडे, श्रीकांत भारतीय उपस्थित होते . यावेळी चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तर प्रदीप गारटकर यांनी सांगितले की, अनेक वर्षे स्थानिक राजकारणामुळे अन्य पक्षांमध्ये काम केले. मात्र भाजपा परिवाराबरोबर असलेली विचारांची नाळ कधीच तोडली नाही. या पुढील काळात पुणे जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू .

गारटकर यांनी पतित पावन संघटनेचे पदाधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी ८ वर्षे काम केले. गारटकर यांच्याबरोबर इंदापूरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननावरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीम भाई बागवान, हाजी नवाब बागवान, इंदापूर पालिकेतील विरोधी पक्ष नेते अनिल अण्णा पवार, अनिल राऊत, यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्याचप्रमाणे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमारे, शरद पवार गटाचे वाई अध्यक्ष नितीन सावंत यांचाही यावेळी भाजपमध्ये प्रवेश झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >