भालचंद्र कुबल, पाचवा वेद
आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे "अभिमान" चित्रपट. खरे तर "स्टार इज बाॅर्न" (१९५४) हा चित्रपट त्याच्यामुळे आहे असं म्हटलं जातं; परंतु पुढे स्टार इज बाॅर्न चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार जोड्यांना घेऊन बनविलेल्या चारही एडिशन्स (आवृत्त्या) बघणेबल होत्या. जशी जाॅर्ज बर्नार्ड शांची पिग्मॅलिअन गाजल्यावर "माय फेअर लेडी"च्या कित्येक भाषांत आवृत्त्या निघाल्या, "रोमन हाॅलिडे"वर निघाल्या, त्याच पठडीत स्टार इज बाॅर्न मोडतो. एखाद्या परकीय भाषेतील चित्रपटावरून सर्रास भारतीय चित्रपट वा कलाकृती बनवण्याचा हव्यास आजही दिसून येतो. शिवाय हाॅलिवूडही या हीट फाॅर्म्युलाचे अनुकरण करताना दिसून येते. स्टार इज बाॅर्न खरे तर १९३२ सालच्या "वाॅट प्राईज हाॅलिवूड ?"ची फोटोकाॅपी होती. त्यात पुढे इतके बदल होत गेले, की हृषिकेश मुखर्जींनी आपल्या एका मुलाखतीत अभिमानची कथा गायक किशोर कुमार आणि रूमा घोष या जोडप्यांच्या वैयक्तिक जीवनावर आधारीत आहे, असे म्हटले होते. स्टार इज बाॅर्नच्या यशानंतर मात्र नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी यांच्यातील महत्त्वाकांक्षी जोडीदाराच्या रिलेशनशिपला खेळवत अनेक प्रयोग मग नाटक सिनेमातून हाताळले गेले. हल्लीच रंगमंचावर पदार्पण झालेल्या "लागली पैज" या नाटकाचा प्रयोग बघितल्यावर अशा अनेक चित्रपटांतील प्रसंग आठवत राहिले. हे नाटक एखाद्या चित्रपटावर आधारीत आहे असा माझा बिल्कुल दावा नाही; परंतु या आधी येऊन गेलेल्या करीयरीस्टीक कपल्सच्या लवस्टोरीज आठवत रहातात. कधी कधी लेखकाला माहितही नसतं की या आधी असंच काहीसं येऊन गेलंय म्हणून. पण मग सादरीकरणानंतर एखाद्या त्रयस्थाकडून कळल्यावर लेखकाचा हिरमोड झाल्यावाचून राहत नाही. म्हणून मी जास्त खोलात न जाता हर्षद कठापूरकर या लेखकाच्या या प्रामाणिक प्रयत्नाला दाद देईन. नाटकाच्या कथानकाबाबत सद्याच्या पिढीची आयटी प्रोफेशनची बॅकग्राऊंड असलेली पैशाच्या हव्यासाची रॅटरेस एवढी वन लायनर नाटकाचे कथानक समजून घ्यायला पुरेशी आहे. सिटीझन केन, रेसलर, व्हिप्लाश, जोकर, स्कारफेस, देअर विल बी ब्लड, क्रेमर व्हर्सेस क्रेमर, द वाईफ, मॅरेज स्टोरी, सीन्स फ्राॅम मॅरेज असे डझनभर चित्रपट "लागली पैज"मध्ये गुंतल्याचा भास होत राहतो. त्यामुळे कथानकाच्या मणक्याला झालेला स्पाँडीलायसिस सतत अस्वस्थ करत राहतो. कधी-कधी वाटतं की हे नाटक आय. टी. क्षेत्रातील लेखकानेच लिहायला हवं होतं. त्या क्षेत्रात वापरले जाणारे शब्दप्रयोग, जार्गन्स, अटीट्युड, टेम्परामेंट हे सर्व मिसिंग आहे. बरं दिग्दर्शकाने यात स्वतःचे काही योगदान म्हणून एकमेकांच्या संवादातील अॅडीशन्स म्हणून चालल्या असत्या, त्या देखील कुठेही दिसून येत नाहीत. नाटक सुरू झाले की सर्वसाधारणपणे सातव्या ते आठव्या मिनिटाला प्रेक्षकाना हुक करणारे असावे. मग त्यातला इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी अर्धा तास घेतला तरी प्रेक्षक तो सहन करतात. इथे पहिलाच सीन बारच्या बाहेर दारू प्यायलेल्या अवस्थेत नाटकाचा नायक आणि त्याचा मित्र नाटकाच्या स्टोरी स्ट्रक्चरबाबत बरळतात. बरं हे बरळणं विनोदी वाटावं असा प्रामाणिक प्रयत्न तिघेही करतात. तिघे म्हणजे दोन पात्रे आणि दिग्दर्शक. पण त्यात परत नायिकेचा इंट्रो आहेच, त्यामुळे कॅरेक्टरायझेशनचं समीकरण सुलभ असायला हवं ते चार पेग झाल्याप्रमाणे अडखळंत राहतं. असो. दारुड्याची आणि वेड्याची पात्रे रंगवणे हे चॅलेंज राहिलेले नाही. कुणीही ऐरागैरा, एखादी सिरीयल केलेला नट, काॅन्फीडंट होऊन दारुड्याचा अभिनय करत माती खाताना आपण बऱ्याचदा पाहतो. मग अशा वेळी त्यात काही वेगळेपण आणावं असं नटांना-दिग्दर्शकाला का वाटत नाही. या नव्या पिढीने अरुण नलावडेंनी अभिनित केलेले दारुडे बघायला हवे होते. दारुड्यांमधलं एवढं व्हेरीएशन देणारा एकही मराठी नट अद्याप तरी मी पाहिलेला नाही. तर मग ज्या नाटकाची सुरुवातच ढिसाळ त्या नाटकाचा प्रवास रटाळ, या उक्तीप्रमाणे पुढील सर्व प्रसंग अॅँटीसिपेशनच्या भोवऱ्यात सापडतात, लाॅटरीच्या नंबरावर इंटरव्हल पडतो की नाही बघा, हे मी नाट्यसमीक्षक राजीव जोशींना प्रसंग सुरू झाल्याच सांगितलं आणि म्हणालो.. "लागली पैज?" तर अशा या नाटकात सर्वात लक्षवेधक जर कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे रूमानी खरे हिचे पदार्पण. प्रचंड टॅलेंट असलेली ही अभिनेत्री, स्वतःला सिद्ध तर करतेच; परंतु पूर्ण नाटक तोलून धरते. म्हणजे लागूंचं नटसम्राट, पंतांचं तो मी नव्हेच, निळू भाऊंच सखाराम, मच्छींद्र कांबळींच वस्त्रहरण, भक्ती बाईंचं आई रिटायर्ड होतेय, रिमा लागूंच सविता दामोदर परांजपे, या पंक्तीत ही रूमानी जाऊ शकते फक्त तिला तिच्या तोडीचं नाटक मिळायला हवं. अत्यंत सेंसिबल आणि संयत अभिनयाचा वापर करत तिचे मंचावरचे वावरणे प्रेक्षकांना सुखद करून जाते. संदीप खरेची मुलगी रूमानी, विवेक आपटेचा मुलगा यशोमान, रत्नाकर मतकरींची मुलगी सुप्रिया विनोद, अरुण काकतकरांचा मुलगा अंकुर आणि त्यांच्या बरोबर शंतनू अंबाडेकरांनी उभारलेला हा डोलारा अजूनही छान होईल, फक्त प्रत्येकाने आपापल्या वडलांनी या इंडस्ट्रीसाठी काय काय योगदान देऊन ठेवलंय हे आठवण्याची गरज आहे. एकदा का सहजतेची अनिश्चितता संपली की नाटक पकड घेते की नाही ते बघा... लागली पैज...? (छायाचित्र सौजन्य : संजय पेठे)






