विदर्भातील चार महानगरपालिकांच्या निवडणुकांचे चित्र आज मतमोजणीअंती स्पष्ट होत असून नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या शहरांमध्ये राजकीय समीकरणे वेगवेगळी आकार घेताना दिसत आहेत. कुठे भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश, तर कुठे काँग्रेसची मुसंडी, अशा या निकालांनी विदर्भातील शहरी राजकारणाची दिशा ठरवणारा संकेत दिला आहे.
वार्तापत्र विदर्भ अविनाश पाठक
महाराष्ट्र महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मतदान गुरुवारी पार पडले. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या चार महानगरपालिकांमध्ये मतदान शांतपणे पार पडले. अर्थात मतदान म्हटले, की थोड्याफार घटना दुर्घटना असतातच तशा इथेही घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी चारही महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू झाली असून हे वार्तापत्र लिहीत असताना चारही महापालिकांचे कल हाती आले आहेत. ते कल बघता नागपुरात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची एक हाती सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. या दोघांनाही मिळून १५१ पैकी शंभरच्या वर जागा मिळतील हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे २००७ पासून नागपुरात महापालिकेची भाजपची सत्ता सुरू झाली ती आजही कायम राहिली आहे, हे चित्र या क्षणी तरी दिसते आहे.
नागपूरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र शेवटपर्यंत हे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत. शेवटी दोघांनीही आपापले उमेदवार मैदानात उतरवले आणि विरोधकांवर टीका करण्यापेक्षा एकमेकांवर टीका करण्यातच वेळ घालवला. त्यामुळे भाजप, शिवसेना युतीला मैदान आयतेच मोकळे मिळाले होते. हे सर्व निकाल बघता नागपुरात पुन्हा एकदा देवा भाऊच हे स्पष्ट झाले आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी, विकास कुंभारे, मोहन मते तसेच शहर अध्यक्ष दया शंकर तिवारी, माजी आमदार अनिल सोले, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय भेंडे, माजी आमदार गिरीश व्यास हे आणि इतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकद लावली होती. त्याचे परिणाम या निकालात दिसले आहेत. हे वार्तापत्र लिहीत असेपर्यंतची स्थिती अशी आहे, अमरावतीत मात्र भाजपची सत्ता येणे या क्षणी तरी कठीण दिसते. ८० पैकी ५७ जागांमध्ये भाजप २३ जागांवर विजयी झाली आहे किंवा आघाडीवर आहे, तर काँग्रेसने ३० पेक्षा अधिक जागा घेतल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे मत विभाजन भरपूर झाल्याचे बोलले जात आहे. तरीही राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर महायुतीची सत्ता बसू शकेल असे बोलले जात आहे. अर्थात अजून सर्व जागांचे निकाल आणि कल हाती यायचे आहेत. ते आल्यावर चित्र कदाचित वेगळे देखील राहू शकेल असे बोलले जात आहे. अकोल्यात मात्र भाजप-शिवसेना युतीने एकहाती यश मिळवले आहे. तिथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला फारशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे अकोल्यात युतीची सत्ता येईल हे चित्र निश्चित आहे.
चंद्रपूरमध्ये मात्र भाजपची सत्ता येणे कठीण असल्याचे चित्र आहे. तिथे ६६ मतदारसंघांपैकी २३ जागांवर फक्त भाजपला विजय मिळू शकला आहे. शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसने मात्र चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे इथे मात्र भाजपची सत्ता येणे कठीण आहे. तसेही चंद्रपूर जिल्ह्यात भाजपमधील जुने दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसमधून उपरे आलेले किशोर जोरगेवार यांच्यात प्रचंड संघर्ष चालू होता. त्यामुळेच भाजपच्या हातून लोकसभेची जागा सहज निघून गेली होती. नगर परिषद निवडणुकांमध्येही भाजपला चांगलाच मार खावा लागला होता. आता देखील चंद्रपूर महानगरपालिका हातून जाईल हे अगदी निश्चित झाले आहे.
गुरुवारी मतदान होणार, त्याआधी मंगळवारी संध्याकाळी प्रचार थांबला तोवर या चारही महापालिकांमध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. मंगळवारी शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीतरी वर्षांनी स्वतः मोटरसायकल चालवत प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्या या प्रचार रॅलीने एकूणच हवेत चांगलाच जोश भरला. त्याआधी देखील देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण या सर्व दिग्गजांच्या सभा नागपुरात झाल्या होत्या. शेवटच्या दिवशी चंद्रपुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः पायी पदयात्रा काढली. त्यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण करण्यात यशस्वी झाली.
अमरावतीत अजित पवारांनी प्रचार सभा घेतल्या, तर अकोला आणि अमरावतीत एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी आले होते. एकूणच चारही महानगरपालिकांमध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलाच जोश भरला होता. जाहीर सभा, प्रचार रॅली, पदयात्रा, होर्डिंग्स आणि समाजामध्ये संपर्क या माध्यमातून सर्वच पक्षांनी प्रचाराची चांगलीच हवा निर्माण केली होती. आता निकाल जाहीर होऊ लागले आहेत. हे वार्तापत्र प्रकाशित होईल त्यावेळी चारही महानगरपालिकांमध्ये कारभारी कोण हे चित्र स्पष्ट झालेले असेल आणि चारही महानगरांमध्ये नवे पर्व सुरू होईल हे निश्चित.