Saturday, January 17, 2026

नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

१११ पैकी ६६ जागांवर भाजप विजयी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. अधिकृत माहितीनुसार १११ पैकी ६६ जागांवर भाजपने विजय मिळवला असून, शिवसेना (शिंदे गट) २४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांमुळे शहरातील बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. निकाल जाहीर होताच माध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले.

मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही:

नवी मुंबईतील विविध भागांत सुरू असलेली अनधिकृत टोलेजंग इमारतींची बांधकामे तात्काळ थांबवण्यात येतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

याशिवाय निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांना प्रशासन, कायदे आणि नगररचनेबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. “शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही,” अशी ठाम भूमिका नाईक यांनी मांडली. तसेच सिग्नलवरील वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न, स्वच्छता व नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर २०३० पर्यंत ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या निवडणुकीत नवी मुंबईत लढत चुरशीची ठरली होती. प्रचारादरम्यान गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >