जालना : जालना महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ६५ पैकी ४१ जागा जिंकून भाजपने या महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता काबीज केली आहे. जालना महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. यापूर्वी नगरपरिषद अस्तित्वात असताना १९९१-१९९२ पासून शिवसेना आणि भाजपने सर्व निवडणुका एकत्रित युती म्हणून लढविल्या होत्या. परंतु, एकदाही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकला नव्हता. कायम शिवसेनेच्या अधिक जागा निवडून येत गेल्यामुळे भाजपला नेहमीच उपाध्यक्षपदावर समाधान मानावे लागले होते. महानगरपालिका अस्तित्वात आल्यावर भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक स्वबळावर लढविली. त्यामध्ये भाजपला ४१ तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. काँग्रेसला ९ तर एमआयएम पक्षाला दोन जागा मिळाल्या.