मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट रामायण मंदिरात जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची विधीवत स्थापना केली जाणार आहे. हे शिवलिंग तब्बल २१० टन वजनाचे असून त्याची उंची ३३ फूट आणि घेरही ३३ फूट आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार असून, हे अजस्त्र शिवलिंग उचलण्यासाठी बंगाल आणि भोपाळ येथून ७०० आणि ५०० टन क्षमतेच्या दोन विशेष क्रेन मागवण्यात आल्या आहेत.
प्रतिनिधी: केंद्र सरकारने ऑनलाईन जुगार व धोकादायक बेटिंग इंस्टंट मनी संबंधित २४२ ॲपवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे ही ॲप ब्लॉक करण्यात आली असून जन ...
शिवलिंगाची खासियत
बिहारमधील मोतिहारी येथील कैथवालिया येथे उभारले जाणारे 'विराट रामायण मंदिर' हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जागतिक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या मंदिर संकुलाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे स्थापित केले जाणारे जगातील सर्वात मोठे शिवलिंग, ज्याची उंची आणि घेर प्रत्येकी ३३ फूट असून त्याचे वजन तब्बल २१० टन आहे. हे भव्य मंदिर एकूण १५० एकर जागेच्या विस्तीर्ण परिसराचे लक्ष्य ठेवून सध्या १२० एकरांवर पसरले आहे. या संकुलात एकूण २२ मंदिरे आणि १२ शिखरे असतील, ज्यामध्ये मुख्य शिखराची उंची २७० फूट इतकी प्रचंड असेल. मंदिराची भव्यता त्याच्या रचनेतूनही दिसून येते; याची लांबी १०८० फूट आणि रुंदी ५४० फूट असून, मुख्य शिखराव्यतिरिक्त १९० फूट उंचीचे एक, १८० फुटांची चार, १३५ फुटांचे एक आणि १०८ फूट उंचीची पाच शिखरे या वास्तूच्या सौंदर्यात भर घालतील. या मंदिराचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आहे. अयोध्या (प्रभू रामाची नगरी) आणि जनकपूर (माता सीतेचे जन्मस्थान) यांच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणाला 'जानकी नगर' असे नाव देण्यात आले आहे. राम जानकी पथावर वसलेले हे मंदिर अयोध्येपासून ३१५ किलोमीटर, जनकपूरपासून ११५ किलोमीटर आणि बिहारची राजधानी पाटण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. पौराणिक संदर्भानुसार, विवाहानंतर अयोध्येला परतताना प्रभू रामांनी याच ठिकाणी मुक्काम केला होता, ज्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक वलय प्राप्त झाले आहे. या भव्य वास्तूची आणि शिवलिंगाची साक्ष घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी मोतिहारीमध्ये होत आहे.






