मुंबई : राज्यातील २९ पैकी २३ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. मुंबईसह २१ महापालिकांमध्ये भाजप तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली मनपात शिवसेना मोठा पक्ष झाला आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीसाठी आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी फडणवीस सरकारच्या एका महत्त्वाच्या उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली.
महापालिकांसाठी प्रचार करताना संकेत दिले होते त्याप्रमाणे लवकरच घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला जाईल; असे मंत्री नितेश राणे म्हणाले. मुंबईसह राज्यात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या सर्व घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई होईल; असे नितेश राणे यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कॅमेरा - माईक घेऊन तयार राहावे. लवकरच कारवाई होताना दिसेल, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. मतदारांनी मुंबईसह राज्यात विकासकामं करणाऱ्या भाजप महायुतीला भरभरुन मतं दिली आहे. मतदारांचा विश्वास भाजप महायुती सार्थ ठरवेल, असे स्पष्ट संकेत मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुंबईसह सर्वच शहरांमध्ये विकासकामांना चालना दिली जाईल. विकासातून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल; अशी माहितीही त्यांनी दिली.
मुंबई महापालिकेत १९९७ पासून एकाच पक्षाची सत्ता आहे. पण उद्धव यांनी सत्ता हाती असताना विकासाऐवजी भलत्याच कामांना प्राधान्य दिले. महापालिकेतले त्यावेळचे सत्ताधारी स्वार्थ साधण्यात गुंतले होते. पण आता चित्र बदलेल. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये विकासाला गती देण्यावर भाजप महायुती भर देणार असल्याचे मंत्री नितेश राणेंनी सांगितले.
मनपा निवडणुकांच्यावेळी हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. पण त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक राजकारणाचा फायदा घेऊ एमआयएमचे १२५ जण निवडून आले. यातून बोध घेऊन हिंदूंनी एकजूट करावी असे नितेश राणे म्हणाले.महायुतीची सत्ता आली आहे. आता मुंबईत महायुतीचाच हिंदू मराठी महापौर होणार अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली.






