मोहित सोमण: अखेर आज शेअर बाजारात नवा कुठला ट्रिगर नसल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकारात्मकता कायम राहिली. परिणामी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अखेरच्या उनाड कायम राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी उसळला आहे. सेन्सेक्स १८७.६४ अंकाने उसळत ८३५७०.३५ व निफ्टी २८.७५ अंकाने उसळत २५६९४.३५ पातळीवर स्थिरावला आहे. मुख्यतः आयटी शेअर्समध्ये झालेल्या वाढीसह आगामी तिमाही निकालातील उत्सुकता वाढली. आतापर्यंत आलेल्या समाधानकारक तिमाही निकालांचा परिणाम क्षेत्रीय विशेष निर्देशांकात दिसून येत असून भूराजकीय अस्थिरतेचा फटका काही निर्देशांकात कायम असल्याचे दिसत आहे. यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपली नफा बुकिंग वाढवल्याने बाजारातील कंसोलिडेशनची (एकत्रीकरण) स्थिती बाजारात नोंदवली गेली होती. अस्थिर रूपयासह अस्थिर कमोडिटी किंमतीमुळे मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था तेजीने वाढत असताना आगामी अर्थसंकल्पाकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे. अखेरच्या सत्रात व्यापक निर्देशांकात मिडकॅप शेअर्समध्ये वाढ झाली असली तरी स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाली होती. आज क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ आयटी, पीएसयु बँक, रिअल्टी, तेल व गॅस, प्रायव्हेट बँक निर्देशांकात वाढ झाली आहे. व घसरण हेल्थकेअर, कंज्यूमर ड्युरेबल्स, मिडिया, मेटल,ऑटो निर्देशांकात झाली आहे.
एकूणच युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीबाबत अनिश्चितता कायम असताना फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आगामी दिवसात दरकपातीचे चित्र अमेरिकेत स्पष्ट होईल. ग्रीनलँड व व्हेनेझुएला यांच्यातील अपेक्षित संवादानंतर युएस बाजारात कुठलाही नवा ट्रिगर नव्हता. निश्चितच अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी महागाई आकडेवारीत केल्याने बाजारात सापेक्षता निर्माण झाली आहे. दरम्यान काही क्षणापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युएसने ग्रीनलँडचे अधिग्रहण करण्याची धमकी दिल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिल्याने उद्याची गुंतवणूकदारांची हालचाल पाहणे युएस बाजारात महत्वाचे ठरणार असले तरी आज सुरुवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. आशियाई बाजारातही अखेरच्या सत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ फेडरल बँक (९.९०%), एजंल वन (८.८१%), आयएफसीआय (८.६३%), झेन टेक्नॉलॉजी (८.५०%), एसबीएफसी फायनान्स (५.९७%), इन्फोसिस (५.२७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एचबीएल इंजिनिअरिंग (९.०५%), एल अँड टी फायनान्स (६.९५%), इंजिनियर्स इंडिया (४.७०%), लेमन ट्री हॉटेल्स (४.३५%), एमएमटीसी (४.२९%), साई लाईफ (३.८३%), अपोलो टायर्स (३.३२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात दोन्ही बाजूंनी तीव्र चढ-उतारांसह अत्यंत अस्थिर व्यवहार सत्र दिसून आले. बेंचमार्क निफ्टी २५,६९६ अंकांवर संथ गतीने उघडला, दिवसाच्या उच्चांक २५,८७३ पर्यंत पोहोचला, परंतु २५,८००-२५,८५० च्या पातळीवर तीव्र प्रतिकारामुळे उच्च स्तरावर टिकून राहण्यात अयशस्वी ठरला. अखेरीस हा निर्देशांक २५,६६२ च्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरला, जे उच्च स्तरावर नफावसुली दर्शवते. क्षेत्रीय आघाडीवर, आयटी, रिअल्टी, बँकिंग आणि तेल व वायू क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली आणि व्यापक बाजाराला आधार दिला. याउलट, आरोग्यसेवा, फार्मा, ग्राहक टिकाऊ वस्तू, सीपीएसई आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे बाजाराची पुढील वाढ मर्यादित राहिली. आयटी क्षेत्राने सर्वाधिक चांगली कामगिरी केली, ज्यात २.९% वाढ झाली. इन्फोसिसमधील जोरदार तेजीमुळे ही वाढ झाली, ज्याने मजबूत तिमाही निकालांनंतर आणि संपूर्ण वर्षासाठी महसूल वाढीचा अंदाज वाढवल्यानंतर जवळपास ५% ची उसळी घेतली. डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, बाजाराची व्याप्ती किंचित सकारात्मक राहिली, ज्यात ८२ शेअर्सच्या घसरणीच्या तुलनेत १३१ शेअर्समध्ये वाढ झाली. ३६०वन, एंजलवन, फेडरल बँक, पॉलीकॅब आणि पॉवरइंडियामध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्टची भर पडली, जे या शेअर्समधील वाढलेली हालचाल दर्शवते. निफ्टी ऑप्शन्सच्या दृष्टिकोनातून,सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट २६००० आणि २५८०० स्ट्राइक किमतींवर केंद्रित आहे जे उच्च स्तरावर तीव्र प्रतिकार दर्शवते. पुट बाजूला, सर्वाधिक ओपन इंटरेस्ट २५७०० आणि २५८०० वर दिसत आहे, जे नजीकच्या काळात तात्काळ आधार दर्शवते. निफ्टी पीसीआर ०.६८ आहे, जो बाजारातील सावध भावना दर्शवतो. भूराजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर,संभाव्य रात्रभराचे धोके कमी करण्यासाठी, बाजार सहभागी आठवड्याच्या अखेरीस आपली पोझिशन्स हलक्या करण्याची शक्यता आहे.'
बँक निफ्टी बद्दल गुंतवणूकदारांना सल्ला देताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'आजच्या सत्राने बँक निफ्टी निर्देशांकाच्या एकूण चार्ट रचनेला एक सकारात्मक दिशा दिली, जो त्याच्या घसरत्या ट्रेंडलाइन ब्रेकआउट पातळीच्या वर स्थिरावत होता. निर्देशांकाने एका तेजीच्या कँडलस्टिकसह आत्मविश्वासाने सत्र समाप्त केले, तर आर एस आय (Relative Strength Index RSI) ने तेजीच्या क्रॉसओव्हरसह मजबुतीची पुष्टी केली आणि तो सध्या ६१ च्या जवळ आहे. उपरोक्त तांत्रिक मांडणीचा विचार करता, दृष्टिकोन तेजीचा राहतो. तात्काळ आधार (Immdiate Support) ५९५०० पातळीजवळ आहे, जो २० दिवसांच्या एसएमए (Simple Moving Average SMA) SMA च्या सध्याच्या स्थितीशी जुळतो. वरच्या बाजूला, निर्देशांक ६०५०० च्या प्रतिरोध क्षेत्राची चाचणी करेल अशी अपेक्षा आहे. जोपर्यंत निर्देशांक ५९२०० पातळीच्या वर टिकून राहतो, तोपर्यंत घसरणीच्या वेळी खरेदीचा दृष्टिकोन ठेवावा.'
एकूणच बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'सत्रादरम्यान माहिती तंत्रज्ञान आणि मध्यम-श्रेणीतील बँकिंग समभागांच्या चांगल्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमुळे इक्विटी बाजारांमध्ये सकारात्मक गती दिसून आली. तथापि, सत्राच्या अखेरीस झालेल्या नफावसुलीमुळे तेजीला आवर बसला, परिणामी बाजारात केवळ किरकोळ वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्याला उद्योगातील एका प्रमुख कंपनीने महसूल वाढीच्या अंदाजांमध्ये केलेल्या वाढीव सुधारणेचा आणि वाढीव तंत्रज्ञान खर्चाच्या अपेक्षांचा पाठिंबा मिळाला. दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांकडेही वळले, कारण सुरुवातीच्या निकालांमध्ये मालमत्तेची गुणवत्ता आणि मार्जिन प्रोफाइलमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली, ज्यामुळे या क्षेत्रातील भावनांना आणखी बळकटी मिळाली.'






