Friday, January 16, 2026

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत बजेट मांडतील. मात्र, त्यापूर्वी अर्थमंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा पाळली जाते, ती म्हणजे ‘हलवा सेरेमनी’. ही केवळ एक गोड मेजवानी नसून अर्थसंकल्पाच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची ही अधिकृत सुरुवात असते. काय असते ‘हलवा सेरेमनी’?

बजेटला अंतिम स्वरूप दिल्यानंतर आणि त्याची प्रत्यक्ष छपाई किंवा डिजिटल फीडिंग सुरू होण्यापूर्वी दिल्लीतील अर्थमंत्रालयाच्या मुख्यालयात (नॉर्थ ब्लॉक) एका मोठ्या कढईत हलवा बनवला जातो. अर्थमंत्री स्वतः हा हलवा ढवळून या कार्यक्रमाची सुरुवात करतात आणि मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांना तो स्वहस्ते वाढतात. या कार्यक्रमाला बजेटच्या ‘लॉक-इन’ (Lock-in) प्रक्रियेची सुरुवात मानले जाते. भारतीय संस्कृतीत कोणत्याही मोठ्या आणि शुभ कामाची सुरुवात ‘गोड’ खाऊन करण्याची परंपरा आहे. याच विचारातून दशकांपूर्वी या सेरेमनीला सुरुवात झाली. ही परंपरा केवळ गोड खाण्यापुरती मर्यादित नसून, रात्रंदिवस बजेट तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे.

अधिकारी होतात १० दिवस ‘नजरकैद’!

हलवा वाटपाचा कार्यक्रम संपला की, बजेट छपाई आणि डेटा एन्ट्रीशी संबंधित १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकच्या बेसमेंटमध्ये असलेल्या प्रेसमध्ये जातात. तिथून पुढचे १० दिवस हे अधिकारी बाहेरील जगासाठी ‘अदृश्य’ होतात. जोपर्यंत अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्पाचे भाषण पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी आपल्या कुटुंबाला भेटू शकत नाहीत किंवा फोनवर बोलू शकत नाहीत.

कडक सुरक्षा व्यवस्था

इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) चे अधिकारी या बेसमेंटवर २४ तास पहारा देतात. तिथे फक्त एक लँडलाईन फोन असतो, ज्यावर केवळ बाहेरून फोन येऊ शकतो, पण आतून बाहेर फोन करता येत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था त्याच बेसमेंटमध्ये केली जाते, जेणेकरून बजेटची कोणतीही माहिती बाहेर फुटणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >