राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल
मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेवून हार्दिक अभिनंदन केले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालीकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रात सर्व महापालिकांमध्ये महायुतीच्या महाविजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरल्याचे सांगत ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणुक ठाकरे बंधूंनी प्रतिष्ठेची निवडणुक केली होती. गेली २५ वर्ष उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मुंबई महापालीकेवर राज्य होते. मराठी भाषेचा भावनिक मुद्दा उपस्थित करुन उध्दव आणि राज या दोन बंधुनी मुंबई पालिकेची निवडणुक चुरशीची केली होती. या निवडणुकीच्या निकालाबाबत आपण आधीच सांगितले होते की, मुंबईत मराठी जनता ही भावनिक राजकारणाला भुलणार नाही. विकासाच्या मुद्दयांना मराठी जनता महत्व देईल. मराठी भाषिक जनतेने आणि मुंबईतील गैरमराठी जनतेने महायुतीला भरभरुन मतदान केले आहे. त्यामुळे महायुतीचा महाविजय झालेला आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करु शकली ते केवळ भाजपच्या पाठिंब्यामुळे!२०१२ सालापासुन रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेला शिवशक्ती -भिमशक्तीच्या माध्यमातुन पाठिंबा दिला होता. मात्र आता भाजप रिपाइं ठाकरे सेने सोबत नसल्यामुळे शिवसेनेचा दारुण पराभव झालेला आहे. राज ठाकरे यांच्या युतीमुळे उध्दव ठाकरेंचा फायदा होणार नाही; हे मी या आधीच सांगितले होते असे ना. रामदास आठवले म्हणाले.
राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालिकेत महायुतीचा महाविजय होणार असल्याचा आपला अंदाज खरा ठरला असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्यभरातील २९ महापालिकांमध्ये महायुतीने चांगली कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईत महायुतीचा महाविजय झाला असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. महायुतीला महाविजय दिल्याबद्दल मुंबईकरांचे आणि राज्यातील जनतेचे ना. रामदास आठवले यांनी आभार मानले आहे. आंबेडकरी जनतेने आपला कौल महायुतीला दिल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेचेही आभार मानले आहेत.






