Friday, January 16, 2026

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी तब्बल १०,७२५ मतांच्या प्रचंड फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा पराभव केला असून, या विजयाने उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

प्रतिष्ठेची लढाई आणि राजकीय संघर्ष

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी केवळ प्रतिष्ठेचीच नाही, तर 'निष्ठावंत विरुद्ध पक्ष बदलणारे' अशा संघर्षाची बनली होती. ठाकरे गट आणि मनसे युतीने याठिकाणी मोठे आव्हान उभे केले होते, मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी सर्व समीकरणे मोडीत काढत निर्विवाद यश मिळवले. प्रचारादरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेले भविष्यातील विकासाचे मुद्दे आणि मतदारांशी साधलेला भावनिक संवाद त्यांच्या पथ्यावर पडला. अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन आणि भाजपची ताकद यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला. १०,७२५ मतांचा हा मोठा फरक हेच दर्शवतो की, मतदारांनी केवळ सहानुभूतीच नाही तर तेजस्वी यांच्या नेतृत्वावरही विश्वास दाखवला आहे.

दहिसरमध्ये जल्लोष

निकालाची अधिकृत घोषणा होताच दहिसर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तेजस्वी घोसाळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. "हा विजय प्रभाग २ मधील जनतेचा आणि अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा विजय आहे," अशा भावना यावेळी तेजस्वी यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >