मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. राज्याच्या राजकारणात 'चाणक्य' मानल्या जाणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला तब्बल १४ महानगरपालिकांमध्ये आपले खातेही उघडता आलेले नाही. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी दोन्ही पवार (अजित पवार आणि शरद पवार) एकत्र लढले, तिथेही मतदारांनी त्यांना सपशेल नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
१४ शहरांत राष्ट्रवादी 'शून्य'वर!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल धक्कादायक ठरताना दिसत आहे. मतमोजणीच्या ...
हाती आलेल्या आकडेवारीनुसार, नवी मुंबई, मालेगाव, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, जालना, उल्हासनगर, पनवेल, चंद्रपूर, नाशिक, इचलकरंजी, वसई-विरार आणि मीरा भाईंदर या महत्त्वाच्या १४ महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आलेली नाही. ज्या पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मोठी ताकद होती, तिथे पक्षाचा 'भोपळा'ही न फुटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
पवारांच्या युतीचा प्रयोग फसला
या निवडणुकीत काही ठिकाणी 'अजित पवार आणि शरद पवार' हे दोन्ही गट एकत्र येऊन लढले होते. कौटुंबिक आणि राजकीय समेट घडवून महायुतीला रोखण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, मतदारांनी या युतीला पूर्णपणे नाकारले आहे. कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि महायुतीचा (भाजप-शिंदे गट) वाढता प्रभाव यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडले आहे.
कुठे किती जागा?
मुंबई : २८ जागा (मर्यादित यश)
परभणी : ११ जागा (येथे पक्षाने आपली ताकद टिकवून ठेवली आहे)
सांगली : ३ जागा
लातूर : १ जागा
कल्याण : १ जागा
बाकी १४ महापालिका : ० (शून्य)
राज्यात सर्वत्र पिछाडीवर असताना केवळ परभणी महानगरपालिकेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा दिला आहे. येथे पक्षाने ११ जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व टिकवले आहे. मुंबईतही २८ जागांवर समाधान मानावे लागले असून सत्तेच्या समीकरणातून राष्ट्रवादी बाहेर फेकली गेली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 'पवार' पॅटर्नला सुरुंग!
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीला मतदारांनी जोरदार धक्का दिला आहे. एकेकाळी या दोन्ही शहरांवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला यंदा भाजपने धोबीपछाड दिली आहे.
पुणे महानगरपालिका : येथे राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहात झाली आहे. पुण्यातून फक्त ३ जागा राखता आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड : अजित पवारांचे 'होम ग्राऊंड' समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्येही महायुतीने वर्चस्व राखले आहे. येथे दोन्ही पवार एकत्र आल्यामुळे मोठी चुरस अपेक्षित होती, परंतु महायुतीच्या लाटेत पवारांचा हा बालेकिल्ला पूर्णपणे ढासळला असून राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवण्यात अपयश आले आहे.





