शाईवरून उभं केलेलं कुभांड हा विरोधी पक्षांचा स्टंट असल्याचं संध्याकाळपर्यंत उघड झालंच. अगदी एखाद्याच्या बोटावरून शाई पुसली गेली, तरी त्याने मतदान केंद्राच्या रजिस्टरमध्ये केलेली सही आणि त्याच्या मतदानाची नोंद कशी पुसता येईल?
राज्यातल्या २९ महानगरपालिकांतील २ हजार ८६९ नगरसेवकांना निवडण्यासाठी काल ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांना संधी होती. या संधीचा लाभ किती जणांनी घेतला, ते अंदाजे आज कळेल. आज हा अग्रलेख वाचत असाल, तेव्हां विविध उमेदवार आपापल्या दैवतांच्या मंदिरात जाऊन साकडं घालून बसले असतील. खासगी दूरचित्र वाहिन्यांनी काल मतदान संपल्या संपल्या आपल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल सांगायला सुरुवात केली. ज्या संस्थांनी हे अंदाज वर्तवले आहेत, ते त्यांचे अंदाज असतील आणि ते त्यांनी प्रचार काळात घेतलेल्या कानोशावरून, एकूण वातावरणावरून बांधले असतील, तर ठीक. पण, ज्याला 'एक्झिट पोल' म्हणजे 'मतदानोत्तर चाचणी' म्हटलं जातं, त्याचे निष्कर्ष इतक्या झटपट जाहीर करणं केवळ अशक्य आहे. मतदानाची विहीत वेळ संपल्यानंतरही काल अनेक केंद्रांवर मतदान सुरू होतं. काही ठिकाणी तर या विहित वेळेनंतर दोन तास उलटून गेले, तरी मतदान संपलं नव्हतं! निवडणूक आयोगाच्या हाताशी भली मोठी यंत्रणा असूनही नक्की किती मतदान झालं हे अचूकपणे सांगायला त्यांना दुसरा-तिसरा दिवस उजाडतो. तिथे चिमुकली यंत्रणा हाताशी असणाऱ्या अशा संस्था मतदानाची वेळ संपता क्षणी दुसऱ्या मिनिटाला वाहिन्यांद्वारे आपले 'एक्झिट पोल'चे आकडे सांगू लागतात, ही मोठी किमयाच म्हणावी लागेल!! माध्यम क्षेत्राची अगदी तोंडओळख असलेला माणूसही असे अहवाल वाहिन्यांपर्यंत जाणं, त्यांनी त्याची प्रसारणयोग्य तयारी करणं यासाठी किमान किती वेळ लागेल ते सांगू शकेल. त्यामुळे, या 'एक्झिट पोल'ना फार फार तर निवडणूक अंदाज म्हणावं. राजकारणात रस असलेल्या प्रत्येकानेच असे अंदाज बांधलेले असतात. संस्थात्मक स्वरूपात येऊन कोणी असे अंदाज सादर करत असतील, तर त्यांनी त्यांची कार्यपद्धतीही सांगायला हवी. वाहिन्यांनी ती विचारण्याचे कष्टही घ्यायला हवेत. या सगळ्याला टाळूनही काहींचे अंदाज वास्तविक निकालाच्या आसपास आलेच, तर ते त्यांचं
नशीब समजावं.
मतदान २९ महापालिकांसाठी असलं, तरी सर्वांचं लक्ष लागलं असणार, ते मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे. मायानगरी मुंबईशी देशातील प्रत्येकाचं काही ना काही कारणाने भावनिक नातं आहे, हे त्याचं कारण आहेच. पण, त्याशिवायही महत्त्वाचं कारण, मुंबईत सारा देश वसला आहे, हे आहे. मुंबईचा कौल त्यामुळे त्या काळातला संपूर्ण देशाचा कौल मानण्याची पद्धत आहे. आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे ही. ७४ हजार कोटींपेक्षा मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या या महापालिकेच्या आजही बँकेत ८० हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. उर्वरित २८ महापालिकांच्या एकूण जमाखर्चाची बेरीज केली, तरी ती मुंबईपेक्षा कमीच आहे. मुंबईनंतर मोठं शहर मानल्या जाणाऱ्या पुण्याचा वार्षिक जमाखर्च १० हजार कोटीही नाही. ज्या २९ महानगरपालिकांसाठी काल मतदान झालं, त्यातली सगळ्यात छोटी महानगरपालिका इचलकरंजीची आहे. तिचा वार्षिक जमाखर्च केवळ ६०० कोटी रुपयांचा आहे. मोठा गाजावाजा करून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आपलं सगळं लक्ष मुंबईवरच केंद्रीत केलं. अगदी नावाला मुंबईबाहेर चार-दोन ठिकाणी पायधूळ झाडली, त्यामागचं कारण आता लक्षात आलं असेल. मुंबई महापालिका पुन्हा हातात आली, तर आपल्या दोन्ही पक्षांना नवसंजीवनी देता येईल. अन्यथा, आपलं राजकारण यापुढे अधिक वेगाने घसरणीला लागेल, याची कल्पना त्यांना आहे. म्हणूनच केवळ बंधू नाहीत, तर अख्खं ठाकरे कुटुंब जीवाच्या आकांताने मैदानात उतरलं होतं. आपल्या ऐक्याची ग्वाही देत होतं. पक्ष हा आपला कौटुंबिक व्यवसाय असल्याचं प्रत्यंतरच त्यांनी या निवडणुकीत शिवसैनिकांना दिलं. खात्री आहे, मतदाराने फटका दिला, तर दोन्ही पक्ष आता आहेत त्याच्या निम्मेही पुढच्या निवडणुकांत राहणार नाहीत. मुंबईकरांनी यापूर्वी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान केलं, तेव्हा शिवसेना एक होती. राजकीय परिस्थिती अगदी वेगळी होती. तरीही शिवसेनेला भारतीय जनता पक्षापेक्षा फक्त दोनच जागा जास्तीच्या जिंकता आल्या होत्या. त्या शिवसेनेची आता असंख्य शकलं झाली आहेत. ठाकरे कुटुंबाला आपल्याशिवाय अन्य कोणी नेता मान्य नसल्याने दाखवण्यासाठीही त्यांच्याकडे वेगळा चेहरा नाही. तीस वर्षांच्या वाईट, भ्रष्ट कारभाराचं ओझं खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत काल जे अंदाज वर्तवले गेले, ते ढोबळमानाने खरेच ठरण्याची शक्यता आहे. सगळ्यांचे तेच अंदाज आहेत.
एखाद्याचं नांव 'कानफाट्या' पडलं, की सगळेच त्याला दोष देऊ लागतात. त्याच्या नसलेल्या चुकाही सगळ्यांना दिसू लागतात. राज्य निवडणूक आयोगाचं अगदी तसंच झालं आहे. महाराष्ट्रात निवडणूक काळात गोंधळ झाले नाहीत, असं नाही. पण ते गोंधळ व्यवस्थेतले नव्हते. स्थानिक कर्मचाऱ्यांचे होते. गेल्या काही वर्षांत प्रशासनाने आपला नैतिक कणाच गमावला असल्याने अगदी किरकोळ दबावालाही बळी पडायला ते स्वतःहूनच तयार असतात! शाईवरून उभं केलेलं कुभांड हा विरोधी पक्षांचा स्टंट असल्याचं संध्याकाळपर्यंत उघड झालंच. अगदी एखाद्याच्या बोटावरून शाई पुसली गेलीच, तरी त्याने मतदान केंद्राच्या रजिस्टरमध्ये केलेली सही आणि त्याच्या मतदानाची नोंद कशी पुसता येईल? जेव्हा मतदार यादीत मतदारांची दुबार नांवं होती, मृत, स्थलांतरित मतदारांची नांवं बारकाईने तपासून काढून टाकली जात नसत तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा दुबार मतदान शक्य होतं. पण, या निवडणुकीपूर्वी मुंबईच्या मतदार यादीची सखोल तपासणी झाली, अनेक नांवं वजा झाली, हे आरोप करणाऱ्यांना माहीत नव्हतं का? त्याहीपलीकडे उमेदवारांचे प्रतिनिधी मग मतदान कक्षात कशासाठी असतात? शाहिस्तेखानाने लाल महालातून पळताना जसं बोटांवर निभावलं म्हणून सुस्कार सोडला, तशीच सोय या 'शाई'स्तेखानांनी आजच्या निकालासाठी करून ठेवली, एवढंच!