जिल्ह्यात ५६ गट, ११२ गण; एकूण ११.७३ लाख मतदार
रत्नागिरी : संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्हा परिषद व नऊ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले. ही निवडणूक जिल्ह्यातील एकूण ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी रोजीच्या पत्राद्वारे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होत असून आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. १६ ते २० जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तसेच २१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन अर्जाची छाननी २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होणार आहे. छाननी पूर्ण होताच त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत २३, २४ आणि २७ जानेवारी अशी आहे. २५ व २६ जानेवारी या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे त्या दिवशी नोटीस स्वीकारली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले.
२७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांची नावे १० फेब्रुवारीपर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गण असून, त्यांचे आरक्षण ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिसूचनेद्वारे अंतिम करण्यात आले आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी आहे. पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षणही विविध प्रवर्गासाठी लागू असून, राजापूर साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दापोली नागरिकांचा मागास प्रवर्ग, मंडणगड, खेड, संगमेश्वर व लांजा सर्वसाधारण महिला, तर चिपळूण, गुहागर व रत्नागिरीसाठी सर्वसाधारण (अनारक्षित) प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदानाचा हक्क राहणार आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये एकूण ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार असून त्यामध्ये ५ लाख ६४ हजार ९७६ पुरुष तसेच ६ लाख ८ हजार ९१३ महिला आणि १० इतर मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी नमुना क्रमांक १ मध्ये मतदानाचा पर्याय घेण्यात येणार आहे. प्रतिसाद न दिलेल्या मतदारांना घोषणापत्राच्या आधारे मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले.






