Saturday, January 17, 2026

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे. प्राथमिक कलांनुसार भाजप पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ८० जागांवर आघाडीवर आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही भाजपचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट पहिल्यांदाच एकत्र लढले. मात्र, या एकत्रिकरणाचा अपेक्षित लाभ राष्ट्रवादीला झालेला दिसत नाही. उलट, अजित पवार यांनी भाजपशी युती केल्यानंतर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार विभागला गेल्याचे चित्र निकालांमधून स्पष्ट होत आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार दोन्ही राष्ट्रवादी मिळून पुण्यात जेमतेम आठ - नऊ जागांवर विजयी/आघाडी अशा स्थितीत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जागांवर आघाडी घेतली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसाठी तब्बल ८ वर्षांनंतर या निवडणुका झाल्या. बदललेल्या राजकीय समीकरणांचा थेट परिणाम निकालांवर दिसून येतो आहे.

२९ महापालिकांचे चित्र : राष्ट्रवादीला मोठा धक्का

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार, पक्षाला तब्बल १४ महानगरपालिकांमध्ये एकही जागा मिळालेली नाही.

या १४ शहरांत राष्ट्रवादी शून्यावर

नवी मुंबई मालेगाव धुळे जळगाव कोल्हापूर नांदेड जालना उल्हासनगर पनवेल चंद्रपूर नाशिक इचलकरंजी वसई-विरार मीरा-भाईंदर

पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र याच भागात पक्षाचा ‘भोपळा’ न फुटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र आले होते. महायुतीला रोखण्यासाठी केलेला हा प्रयोग मतदारांनी साफ नाकारल्याचे चित्र आहे. कार्यकर्त्यांमधील संभ्रम, मतदारांतील गोंधळ आणि भाजप–शिंदे गटाच्या महायुतीचा वाढता प्रभाव यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना मोठी भगदाडे पडली आहेत.

राज्यात सर्वत्र पिछाडीवर असतानाही परभणी महानगरपालिकेत राष्ट्रवादीला थोडा दिलासा मिळाला असून येथे पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहे. मात्र मुंबईत राष्ट्रवादीला फक्त २८ जागांवर समाधान मानावे लागले असून सत्तेच्या समीकरणातून पक्ष जवळपास बाहेर फेकला गेला आहे.

पुणे–पिंपरीत ‘पवार पॅटर्न’ कोसळला

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही पवारांच्या राजकारणाला मोठा झटका बसला आहे. पुणे महानगरपालिकेत  राष्ट्रवादीला केवळ ३ जागा राखता आल्या, पिंपरी-चिंचवड अजित पवारांचे ‘होम ग्राऊंड’ असतानाही महायुतीने वर्चस्व राखले; राष्ट्रवादी अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरली , एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला यंदाच्या महापालिका निवडणुकांत भाजपने निर्णायक धोबीपछाड दिली, हे प्रारंभीच्या निकालांवरून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment