पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता सासूनेही दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २३ (क) मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी आंदेकर यांनी अवघ्या ८१ मतांनी विजय मिळवला आहे. लक्ष्मी आंदेकर या सध्या तुरुंगात आहेत पण त्यांनी हा विजय मिळवला आहे.
लक्ष्मी आंदेकर या सोनाली आंदेकर यांच्या सून असून बंडू आंदेकर यांच्या वहिनी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग २३ (क) साठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपच्या ऋतुजा गडाळे तर अपक्ष म्हणून कल्याणी गणेश कोमकर मैदानात होत्या. शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने कल्याणी कोमकर यांनी ‘सफरचंद’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. निकालानुसार लक्ष्मी आंदेकर यांना ९,८३३ मते मिळाली असून भाजपच्या ऋतुजा गडाळे यांना ९,७५२ मते मिळाली. त्यामुळे अवघ्या ८१ मतांनी लक्ष्मी आंदेकर यांनी विजय मिळवला. याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनीही मोठा विजय मिळवला आहे. सोनाली आंदेकर यांना १०,८०९ मते मिळाली असून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रतिभा धंगेकर (८,८५९ मते) आणि भाजपच्या अनुराधा मंचे (७,८०७ मते) यांचा पराभव केला आहे. या प्रभागात प्रस्थापित राजकीय कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र मतदारांनी आंदेकर कुटुंबावर विश्वास दर्शवला.