मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी जीवनाला एक कलाटणी मिळते आणि त्याचे बरे वाईट परिणाम भोगत आपण एका स्थित्यांतरात पोहोचतो. "गमन" हा चित्रपट ह्याच विषयावर भाष्य करतो.
मनोज नाईकसाटम लिखित 'कोकण मराठी परिषदेचा पुरस्कार' प्राप्त "अपरांत" कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. तसेच चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन मनोज नाईकसाटम यांचेच आहे. त्याआधी त्यांनी गौराई, वारसा, सेलिब्रेशन असे आशयबद्ध लघुपटही दिग्दर्शित केले आहेत जे राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवांमध्ये प्रदर्शित होऊन त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत.
गमनचा अपरांत कादंबरीपासून सुरु झालेला प्रवास आता थेट चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर झळकण्याकरिता तयार आहे. सिनेमाविषयी आवड आणि जिद्दीच्या जोरावर मनोज नाईकसाटम यांनी हा पल्ला गाठला आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते 'नारायण जाधव' आणि 'भेरा’ चित्रपटातील अभिनयाकरिता २०२४ सालचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभलेल्या अभिनेत्री ‘श्रद्धा खानोलकर’ मुख्य भूमिका साकारत आहेत. उत्तर प्रदेश ते मुंबई आणि मुंबई ते कोकण असा मोठा परीघ या सिनेमाला लाभला आहे. कोकणातील एका खेडे गावात राहणार एक वृद्ध जोडपं जुजबी उपचाराकरिता मुंबईत स्थायिक असलेल्या आपल्या मुलांकडे आलेले असतात. मुलंही त्यांची उत्तम काळजी घेत असतात पण गावाच्या मोकळ्या वातावणात आयुष्य व्यथित केलेल्या तसेच गावाच्या घराबद्दल आणि शेती-वाडीबद्दल आस्था असलेल्या त्या दोघांचं मन मुंबईत रमत नाही.
गणेशोत्सवासाठी हे वृद्धजोडपं पुन्हा गावी जायला निघतं. मुलं आई-वडिलांना उतार वयात सोबतीला म्हणून उत्तर प्रदेशातील गरजू भाऊ आणि बहीण पाठवतात. पण नियतीने काही वेगळंच योजलेलं असतं.
सिनेमा मुंबई आणि कोकण(मालवण) या दोन्ही ठिकाणी चित्रित झाला आहे. चित्रपटाचे शुटींग सुरु असताना थोड्याफार अडचणी येणं हे स्वाभाविकच आहे पण ह्या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे शूटिंग दरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवस वाढल्यावर बजेट कोलमडलं. ह्या सगळ्यात मनोज नाईकसाटम ह्यांनी फार शांत पद्धतीने, समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत हसतखेळत शुटींग पूर्ण केलं संपूर्ण टीमनेही त्यांना उत्तम साथ दिली.
"गमन" आता ‘२२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’मध्ये मराठी स्पर्धा विभागात दाखल झाला आहे. शिवाय पुणे इथे होणाऱ्या प्रतिष्ठित अश्या "पुणे इंटरनेशनल फेस्टिवलमध्येसुद्धा स्पर्धा विभागात गमनची निवड झाली आहे.






