Friday, January 16, 2026

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत १ लाखांपेक्षा अधिक प्रवासी नोंदवून महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २५ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान विमानतळाने १ लाख ९ हजार ९१७ प्रवाशांची सेवा केली, त्यापैकी ५५,९३४ आगमन आणि ५३,९८३ प्रस्थान करणारे होते. विमानतळानुसार १० जानेवारी हा दिवस सर्वाधिक व्यस्त होता, ज्यावेळी ७ हजार ३४५ प्रवाशांचा प्रवासी नोंदवण्यात आले आहेत.

विमानतळाने २५ डिसेंबर पासून एकूण ७३४ हवाई वाहतूक हालचाली (एटीएमएस) हाताळल्या, ज्यात ३२ सामान्य नागरी विमान सेवा संबंधित हालचाली होत्या. विमानतळानुसार प्रत्येक आगमन किंवा प्रस्थानाला एक एटीएम म्हणून मोजले जाते. दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू हे ठिकाणे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अग्रक्रमावर होते. विमानतळाने २२.२१ टन कार्गो देखील हाताळला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एनएमआयए) करत असून, हे अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (एएएचएल) आणि सिडको या महाराष्ट्र सरकारच्या विकास संस्थेच्या संयुक्त उपक्रमाने विकसित केले आहे. एएएचएलकडे ७४% हिस्सा असून सिडकोकडे उरलेला हिस्सा आहे.

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आधुनिक सुविधा, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि कार्यक्षमतेवर लक्ष देऊन एनएमआयए हळूहळू सेवा वाढवत आहे, तसेच सुरक्षा, सेवा गुणवत्ता आणि प्रवाशांचा अनुभव उच्च स्तरावर राखत आहे.” एएएचएलकडे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड चे संचालन देखील आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) चालवते.

Comments
Add Comment