मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संमिश्र स्वरूपाचा कौल मिळाल्याचे चित्र आहे. अनेक प्रभागांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसले, तरी मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले असून या यशात महिला उमेदवारांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे पक्षाचा वेग काहीसा कमी झाला असला, तरी काही प्रभागांत मनसेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेने ५२ प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे बंधूंची शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची आघाडी असूनही मुंबईत अपेक्षित यश मिळवू शकली नाही. काही मध्यवर्ती भागांत मनसेला फटका बसला, तर उपनगरांमध्ये पक्षाने तुलनेने चांगली लढत दिली, असे चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार मनसेला ६ जागांवर विजय मिळाला असून आणखी ९ प्रभागांमध्ये पक्ष आघाडीवर आहे. या विजयामध्ये महिला उमेदवारांचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान मतदारांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि संघटनात्मक ताकद याचा फायदा काही प्रभागांत मनसेला मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. काही ठिकाणी शिवसेना (उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील युतीचाही परिणाम दिसून आला.
मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक ३८ : सुरेखा परब
प्रभाग क्रमांक ७४ : विद्या आर्या
प्रभाग क्रमांक १२८ : सुप्रिया दळवी
प्रभाग क्रमांक ११५ : ज्योती राजभोग
प्रभाग क्रमांक ११० : हरिनाशी मोहन चिराथ
एकूणच, मुंबईत मनसेला अपेक्षेइतके मोठे यश मिळाले नसले, तरी महिला नेतृत्वाच्या जोरावर मिळालेल्या विजयामुळे पक्षाला राजकीय दिलासा मिळाला आहे. पुढील राजकीय वाटचालीसाठी हे निकाल मनसेसाठी आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे हे चित्र या निकालावरून स्पष्ट होत आहे.