Friday, January 16, 2026

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामुळे जालन्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अटीतटीच्या लढतीत बाजी

श्रीकांत पांगारकर यांनी या निवडणुकीत २ हजार ६२१ मते मिळवत आपला विजय निश्चित केला. या प्रभागात भारतीय जनता पक्षासह इतर प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार मैदानात होते. विशेष म्हणजे, येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार रिंगणात नव्हता. पांगारकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना मागे टाकत अपक्ष म्हणून मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले.

विजयाचा जल्लोष आणि 'तो' संदेश

विजय घोषित होताच पांगारकर यांनी आपल्या समर्थकांसह गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. स्वतः पांगारकर कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून नाचताना दिसले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "माझ्यावर आरोप आहेत पण ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जनतेने दिलेला हा निकाल म्हणजे माझ्यासाठी 'जनतेच्या न्यायालयातील' न्याय आहे."

पांगारकर यांचा राजकीय प्रवास आणि वाद

श्रीकांत पांगारकर हे यापूर्वी २००१ ते २००६ या काळात शिवसेनेचे नगरसेवक राहिले आहेत. मात्र, २०११ मध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी हिंदू जनजागृती समितीत प्रवेश केला होता. २०१८ मध्ये एटीएसने त्यांना स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्ती प्रकरणात अटक केली होती, ज्यामध्ये त्यांच्यावर युएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता.

गौरी लंकेश हत्येचे सावट

५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथे गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते. या प्रकरणातील आरोपीने आता थेट निवडणुकीच्या मैदानात बाजी मारल्याने, या निकालाकडे सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा