रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबियांसह डोंबिवली येथील स. वा. जोशी विद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी लोकशाहीच्या या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील महापालिका निवडणुकांबाबतही विश्वास व्यक्त केला. “राज्यात ज्या २९ महापालिकांमध्ये निवडणुका होत आहेत, त्या सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर असेल,” असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.






