Thursday, January 15, 2026

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद

मुंबई : राज्यातील बहुचर्चित २९ महानगरपालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार असून, निकाल काय लागतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण … टक्के मतदानाची नोंद झाली. जवळपास आठ ते नऊ वर्षांच्या कालावधीनंतर या निवडणुका होत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्या प्रतिष्ठेच्या बनवत जोरदार प्रचार केला होता. आता निकालातून राज्यातील शहरी राजकारणाची पुढील दिशा ठरणार असल्याने, मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या निवडणुकीत मराठी माणूस, मराठी अस्मिता, विकास, उद्योगांचे अदानींकडे होत असलेले केंद्रीकरण हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी अस्मितेचा मुद्दा अधिक प्रभावी ठरला. तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आखत असल्याचा आरोप केला. तसेच भाजपकडून महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादली जात असल्याचा आणि परप्रांतीयांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावाही करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीने हे आरोप फेटाळून लावत, मराठी माणसाला मुंबईत परत आणण्यापासून ते मुंबईत मराठी महापौर करण्यापर्यंतची आश्वासने दिली.

काही महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढताना दिसली, तर अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. दुसरीकडे, मनसेच्या प्रभावामुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावण्याच्या भीतीने काँग्रेसने उबाठासोबत अधिकची जवळीक टाळली. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करून दलित आणि मुस्लिम मतांचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने नाराजीचे सूर उमटले, तर पक्षांतर करून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याने अंतर्गत असंतोष उफाळून आला. एकूण २९ पैकी सुमारे १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्याने या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि रंगतदार बनल्याचे चित्र आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांमधील २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, सायंकाळपर्यंत बहुतांश ठिकाणी निकाल स्पष्ट होतील. मुंबई महानगरपालिकेत एकूण १ हजार ७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. २२७ प्रभागांमध्ये सरासरी ७.४९ उमेदवार असल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. मुंबईनंतर पुणे येथे १ हजार १६६, नागपूरमध्ये ९९३ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

कुठे किती मतदान? (दुपारी ३.३० पर्यंतची टक्केवारी)

मुंबई ४१.०८

ठाणे ४३.९६ कल्याण डोंबिवली ३८.६९ नवी मुंबई ४५.५१ उल्हासनगर ३४.८८ भिवंडी निझामपूर ३८.२१ मिरा भाईंदर ३८.३४ वसई विरार ४५.७१ पनवेल ४४.०४ नाशिक ३९.६४ मालेगाव ४६.१८ धुळे ३६.४९ जळगाव ३४.२७ अहिल्यानगर ४८.४९ पुणे ३६.९५ पिंपरी चिंचवड ४०.५ सोलापूर ४०.३९ कोल्हापूर ५०.८५ सांगली मिरज कुपवाड ४१.७९ छत्रपती संभाजीनगर ४३.६७ नांदेड वाघाला ४२.४७ लातूर ४३.५८ परभणी ४९.१६ अमरावती ४०.६२ अकोला ४३.३५ नागपूर ४१.२३ चंद्रपूर ३८.१२ इचलकरंजी ४६.२३ जालना ४५.९४

धुळ्यात मतदान यंत्राची तोडफोड

धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील मीर परिसरातील मारुती प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर गुरुवारी गोंधळाची घटना घडली. मतदान सुरू असताना मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केला आहे. घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

मालेगावमध्ये आढळली ८०० बनावट मतदान ओळखपत्रे

मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील एका खोलीत तब्बल ८०० मतदान ओळखपत्रे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही सर्व ओळखपत्रे बनावट असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि सर्व ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत लोकशाहीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १७-अ मध्ये एका महिलेच्या नावावर परस्पर मतदान झाल्याचे मतदान केंद्रातच उघडकीस आले. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही टीका होत आहे.

पुण्यातील प्रभाग २६ मध्ये ईव्हीएम मशीन बंद

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याची घटना घडली. सुमारे दोन तास मशीन बंद असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचा खोळंबा झाला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या एकाला अटक

छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील मुकुंदवाडी येथील मनपा शाळेच्या मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आलेल्या एका व्यक्तीस पकडण्यात आले. उमेदवारांच्या लक्षात हा प्रकार येताच संबंधित व्यक्तीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मतदान ओळखपत्रावर छापील चिट चिकटवलेली असल्याचे आढळून आले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

नाशिकमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएमबाबत तक्रार

नाशिक शहरातील सावता नगर परिसरात निवडणुकीदरम्यान गोंधळाची घटना घडली. सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैशांचे वाटप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला. अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी समर्थकांसह कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

अकोल्यात मतदान केंद्रावर गोंधळ

अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील मतदान केंद्रावर गोंधळाचा प्रकार घडला. काँग्रेसच्या उमेदवाराने मतदान केंद्रात बसून मतदारांना पंजा चिन्हावर मतदान करण्यास सांगितल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. या प्रकाराकडे मतदान कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

अकोल्यात उमेदवारांमध्ये बाचाबाची

अकोला शहरातील भांडपुरा येथील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास दोन उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. बंदोबस्तावरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही उमेदवारांची समजूत काढली, त्यानंतर परिस्थिती शांत झाली.

Comments
Add Comment