Friday, January 16, 2026

देवगड-आनंदवाडी बंदराचे काम सहा महिने ठप्प!

देवगड-आनंदवाडी बंदराचे काम सहा महिने ठप्प!

काम अर्धवट टाकून ठेकेदार पसार

देवगड : देवगडचे अर्थकारण बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम पावसाळ्यापासून बंद आहे. कोरोनानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले होते. मात्र सद्यस्थितीत गेले सहा महिने काम बंद असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तर प्रकल्पाचा सुधारित अंदाजपत्रकाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एक तपाहून अधिक काम सुरू असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास कधी जाणार? असा प्रश्न नागरिक व मच्छिमार विचारत आहेत. देवगड-आनंदवाडी प्रकल्पाला सन २००८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर कामाला सुरूवात झाली. मात्र काही कारणामुळे दहा वर्षे काम बंद होते.आराखड्यात बदल केल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला सुरूवात झाली आणि सुमारे ८८ कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले. फक्त कोरोना कालावधीत काही महिने हे काम बंद होते. त्यानंतर या कामाला वेगाने सुरूवात झाली. जेटी व भरावाचे काम लगेचच सुरू करण्यात आले. काही इमारतींचेही काम पूर्ण झाले. मात्र पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे काम बंद झाले. ठेकेदाराने साहित्य व यंत्रसामुग्रीही प्रकल्पस्थळावरून हलवली. बंदरातील गाळ काढण्याचे काम अर्धवट राहिल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नौका जेटीला लावणेही कठीण झाले आहे.मच्छिमार शेडचे बांधकामही अर्धवट आहे. अश्या प्रकारे काम अर्धवट टाकून ठेकेदार निघून गेला. यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामाबाबत प्रश्न उभा राहिला असून स्थानिक मच्छिमार लवकरच पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती स्थानिक मच्छीमार व नौकामालक जगन्नाथ कोयंडे यांनी दिली.

आनंदवाडी बंदर प्रकल्पामुळे देवगडचा कायापालट होणार असून या प्रकल्पांतर्गत जेटी, कोल्डस्टोरेज, बोटींच्या दुरूस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यांची सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे देवगड बाजारपेठेलाही उर्जितावस्था येणार असून स्थानिक मच्छीमार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

गाळ काढल्यामुळे पाण्याची खोली वाढून मोठ्या बोटी बंदरात येवू शकतील. जेटीमुळे नौका थेट जेटीला लागल्यामुळे मासळी उतरणे, बर्फ चढविणे, पाणी व डिझेलची व्यवस्था या सुविधा सुलभ होणार आहेत. स्थानिक नागरिक व मच्छिमारांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा असल्याने हा प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा मच्छिमारांची आहे. मात्र प्रकल्पाचे काम गतीने होत नसल्याने संभ्रमावस्था आहे.

Comments
Add Comment