ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता
मुंबई : मुंबईत उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजप-शिवसेना महायुती सत्तेची शर्यत पार करणार, असा अंदाज एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील अन्य महापालिकेतही भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे संकेत या चाचण्यांनी दिले आहेत. विविध संस्थांच्या चाचण्यांचे निष्कर्ष पाहिले असता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजुने मतदारांनी कौल दिल्याचे दिसते.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. त्यातही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील राजकीय घडामोडी विशेष चर्चेत आल्या. दोन दशकांचा दुरावा मिटवत ठाकरे बंधु या निवडणुकांसाठी एक झाले. त्यामुळे ठाकरे बंधु विरूद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट महायुतीने एकमेकांवर टीकेची झोड उठवत राजकीय वातावरण तापविल्याने मुंबईची निवडणूक ही लक्षवेधी बनली. गुरूवारी, मतदानाच्या दिवशीही या आरोप - प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू होत्या. सर्वसाधारणपणे मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकेतील मतदान सुरळीत पार पाडले. शुक्रवारी, मतमोजणी नंतर मतदारांचा जनादेश समोर येणार आहे. तत्पूर्वी, मतदानाचा कालावधी संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. अॅक्सिस माय इंडिया, जनमत, रूद्र रिसर्च, प्राब, जेव्हिसी एक्झिट पोल, जेडीएस, डिव्ही रिसर्च अशा संस्थांनी मतादानाची वेळ संपल्यानंतर तासाभरात आपल्या एक्झिट पोलचे अंदाज जारी केली.
या एक्झिट पोलनी वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीचे आव्हान मोडून काढत भाजप महायुतीचा विजयरथ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. 'अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी भाजप-शिंदे गटाला १३१ ते १५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, ठाकरे बंधुंच्या युतीला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस - वंचित आघाडीला १२ ते १६ आणि इतरांना ६ ते १२ जागा मिळतील असा अंदाज अॅक्सिस माय इंडियाने वर्तविला आहे.
जनमत एक्जिट पोलनेही मुंबईत सत्तापालटाचे भाकीत केले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला १३८ जागा मिळतील, तर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांच्या आघाडीला ६२ जागा मिळतील. तसेच काँग्रेस-वंचितला २० तर इतरांना ७ जागा मिळणार असल्याचा अंदाज जनमतने व्यक्त केला आहे.
रुद्र रिसर्चनुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट १२१, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ७१, काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला २५ जागा मिळतील. तर इतरांना १० जागा मिळतील, असा अंदाज रूद्र रिसर्चने व्यक्त केला आहे. 'द जेव्हीसी एक्झिट पोल'नेही मुंबईत भाजप-शिंदे गट महायुतीला १२९ ते १४६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर, ठाकरे बंधूंना ५४ ते ६४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेस-वंचित आघाडी २१ ते २५ आणि इतरांना ६ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजपची सत्ता येणार असून मतांची टक्केवारीही महायुतीच्या बाजूने राहणार असल्याचा दावा केला आहे. महायुतीला ४२ ते ४५ टक्के, ठाकरे बंधुंच्या आघाडीला ३४ ते ३७ टक्के तर काँग्रेस- वंचित आघाडीला १३ ते १५ टक्के मते मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.






