काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ३० दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे दररोज शेकडो लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन कामे केली जाणार असल्याने या ब्लॉकमुळे तब्बल २४० लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. त्यामुळे या मार्गावरील प्रवास गैरसोयीचा ठरणार आहे.
गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेवर खार रोड ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू करण्यात आली. आता कांदिवली ते बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येत आहे. या नवीन मार्गिकेमुळे लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविणे आणि लोकल फेऱ्या वाढविणे शक्य होईल. कांदिवली ते बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २० डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून ३० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारीपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे. तर, काही लोकल सेवा रद्द केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली ते मालाड दरम्यान अप जलद मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी रात्री ११.१५ ते रात्री ३.१५ आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पाचवा मार्ग बंद केल्यामुळे तसेच वेगमर्यादा लागू केल्यामुळे लोकल सेवा रद्द राहतील. त्यात १२ डबा लोकल, १५ डबा लोकल आणि वातानुकूलित लोकलचा समावेश आहे.
जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा
पश्चिम रेल्वेवरील वाढत्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. मर्यादित मार्ग असल्याने लोकल सेवा वाढविणे शक्य होत नाही. वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका होती. गेल्यावर्षी कांदिवलीपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येईल. या नवीन मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. या मार्गिकेमुळे खार ते बोरिवली दरम्यानच्या जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे.





