मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान केंद्रावर मत दिल्यानंतर मतदाराच्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते, हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र ही शाई नेमकी कोणत्या बोटावर, कोणत्या कारणासाठी आणि अपंग मतदारांच्या बाबतीत कुठे लावली जाते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मत दिलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर अमिट शाई लावली जाते. ही शाई नखापासून पहिल्या सांध्यापर्यंत ब्रशच्या साहाय्याने लावण्यात येते. यामागील उद्देश एकच कोणत्याही व्यक्तीने पुन्हा मतदान करू नये आणि प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी.
ही शाई सहज न निघणारी असून ती काही दिवस बोटावर स्पष्टपणे दिसत राहते. त्यामुळे मतदान झाल्याची ओळख कायम राहते.
डाव्याच हातावर शाई का?
दैनंदिन कामांमध्ये बहुतेक लोक उजव्या हाताचा वापर करतात. शाईतील रसायनांचा अन्नाशी किंवा तोंडाशी थेट संपर्क येऊ नये, यासाठी डाव्या हाताच्या बोटावरच शाई लावण्याची पद्धत अवलंबली जाते.
बोट नसल्यास काय नियम?
जर एखाद्या मतदाराचा डाव्या हातावरील पाहिलं बोटं नसेल, तर डाव्या हातावरील दुसऱ्या बोटावर शाई लावली जाते. डाव्या हातावर एकही बोट नसेल, तर उजव्या हाताच्या बोटावर शाई लावण्याची तरतूद आहे.
दोन्ही हात नसतील तर?
अशा विशेष परिस्थितीत संबंधित मतदाराच्या पायाच्या अंगठ्यावर शाई लावली जाते. त्यामुळे शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावता येतो आणि त्याची नोंद ठेवली जाते. मतदान प्रक्रिया सर्वसमावेशक राहावी आणि प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे नियम निश्चित केले आहेत.






