नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात देशातील तीन हजारांहून अधिक स्टार्टअप सहभागी होणार आहेत. नियोजनानुसार शुक्रवार दुपारी एक वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे पंतप्रधान मोदी स्टार्टअपशी संवाद साधणार आहेत.
मोदी सरकारने २०१६ मध्ये स्टार्टअप इंडिया (Startup India) ही मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा वर्षांत भारत स्टार्टअपच्या जगात तिसऱ्या स्थानावर आहे. देशात सुरू झालेल्या स्टार्टअप रोजगार निर्मितीला चालना मिळाली आहे.
डीपीआयआयटीच्या आकडेवारीनुसार भारतात २०१६ मध्ये ५०० च्या आसपास स्टार्टअप होते. याच सुमारास मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया ही मोहीम सुरू केली. या मोहिमेमुळे अवघ्या दहा वर्षांत देशातील स्टार्टअपची संख्या वाढून दोन लाख नऊ हजार ४८७ वर जाऊन पोहोचली. सोप्या भाषेत सांगायचे तर देशातील स्टार्टअपच्या संख्येत दहा वर्षांमध्ये ४२० पटींनी वाढ झाली आहे. आहेत.
भारतात २०१६ मध्ये जेमतेम चार ते पाच युनिकॉर्न होते. आता जानेवारी २०२६ मध्ये देशात १२० पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत. भारतातल्या स्टार्टअपनी जवळपास २० लाख नोकऱ्यांची निर्मिती केली आहे. सर्वाधिक रोजगार निर्मिती ही देशातल्या आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील स्टार्टअपमधून झाली आहे.
देशात कार्यरत असलेल्या किमान ७५ हजार स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे. देशातील स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व्हावी यासाठी मोदी सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा कॉर्पस फंड उभारला आहे. या फंडातील रक्कम सरकार इनक्युबेटर्स अथवा सेबीकडे नोंदणी असलेल्या AIF द्वारे स्टार्टअपमध्ये गुंतवते. सरकारने २०२१ मध्ये सुरू केलेल्या कॉर्पस फंडात आता ८४५ कोटी रुपये आहेत. या निधीतून स्टार्टअपना उद्योग उभारणीसाठी आवश्यक ती मदत दिली जाते.
केंद्र सरकारने स्टार्टअप कंपन्यांना कर सवलतींच्या स्वरुपात तसेच काही कायद्यांमध्ये सवलती देऊन स्टार्टअपना चालना देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने स्टार्टअपना पेटंट मिळवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी पेटंट प्रक्रिया सोपी केली आहे. यातून संशोधनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला नवीन क्लायंट मिळावे आणि पुरवठादारांना भेटण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याकरिता मोदी सरकारने दरवर्षी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्टअप महाकुंभ सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी रोजी दुपार एक वाजता स्टार्टअप महाकुंभाच्या निमित्ताने देशाला संबोधित करणार आहेत. सोहळ्याच्या निमित्ताने निवडक स्टार्टअपचे प्रतिनिधी थेट पंतप्रधान मोदींशी संवाद साधू शकतील.
निवडक स्टार्टअप प्रतिनिधी उद्योजकीय प्रवासातील अनुभव मांडणार
राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी एक वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान भारताच्या गतिमान स्टार्टअप परिसंस्थेतील सदस्यांशी संवाद साधणार आहेत. निवडक स्टार्टअप प्रतिनिधी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव मांडणार असून, पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
नवोन्मेषाचे संवर्धन, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि गुंतवणूक-आधारित विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने, तसेच भारताला नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी निर्माण करणाऱ्या राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या हेतूने, पंतप्रधानांनी १६ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ हा परिवर्तनकारी राष्ट्रीय उपक्रम सुरू केला.
मागील दशकात स्टार्टअप इंडिया उपक्रम भारताच्या आर्थिक आणि नवोन्मेषात्मक संरचनेचा एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून उदयास आला आहे. या उपक्रमामुळे संस्थात्मक यंत्रणा अधिक सक्षम झाल्या असून भांडवल आणि मार्गदर्शन उपलब्धतेचा विस्तार झाला आहे. तसेच विविध क्षेत्रे आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये स्टार्टअप्सची वाढ आणि विस्तार करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अभूतपूर्व विस्तार झाला असून देशभरात दोन लाखांपेक्षा अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. या उद्योगांनी रोजगारनिर्मिती, नवोन्मेष-आधारित आर्थिक विकास तसेच विविध क्षेत्रांतील देशांतर्गत मूल्यसाखळ्यांच्या बळकटीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.






