Friday, January 16, 2026

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार असून, ३ कोटी ४८ हजार मतदार आपला कौल देणार आहेत. सकाळी ७ वाजेपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. नेहमीप्रमाणे या लोकशाहीच्या उत्सवात मुंबईतील दिग्गज सेलिब्रिटींनीही आपला सहभाग नोंदवला आहे. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याने सहकुटुंब मतदान केले. बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार, हेमा मालिनी, सुनील शेट्टी आणि दिव्या दत्ता यांसारख्या कलाकारांनी सकाळी लवकरच मतदान केंद्रावर हजेरी लावली. अभिनेते सुमीत राघवन आणि त्यांची पत्नी चिन्मयी सुमीत यांनीही आपला हक्क बजावत नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

नाना पाटेकरांची 'मतदान निष्ठा'

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केवळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाना पाटेकर खास पुण्याहून मुंबईत आले. तब्बल तीन तासांचा प्रवास करून त्यांनी मुंबईत हजेरी लावली आणि मतदान केले. "मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे," असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांसह एकूण २९ महापालिकांसाठी हे मतदान होत आहे. प्रशासनाने मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, अनेक ठिकाणी सेलिब्रिटींना पाहण्यासाठी चाहत्यांचीही गर्दी झाली होती. या सर्व जागांचा निकाल उद्या, १६ जानेवारीला जाहीर होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या मतदानाकडे लागले आहे.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“माझं मतदान मी मुंबईत करतो. मी हल्ली पुण्यात राहतो, पण सकाळी 6 ला तिथून निघालो. आता इथे पोहोचलो आणि मतदान केलं. मला असं वाटतं की मतदान करणं ही आपल्या अस्तित्त्वाची खूण आहे. ते जाणीवपूर्वक सर्वांनी करायला हवं. तुम्हाला जो कोणी उमेदवार योग्य वाटत असेल, त्याला तुम्ही मत द्या. पण जाणीवपूर्वक तुम्ही घराबाहेर पडा. ही सुट्टी म्हणून घरात राहू नका. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा”, असं आवाहन त्यांनी सर्वसामान्यांना केलं आहे.

हेमा मालिनी यांच्याकडून आवाहन

“मी मुंबईकारांना विनंती करते की, तुम्ही मतदान केलं पाहिजे. मुंबईत चांगली हवा पाहिजे असेल, खड्डेमुक्त रस्ते पाहिजे असतील, प्रगती पाहिजे असेल, सुरक्षा हवी असेल तर आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे. माझा मत देण्याचा हक्क मी बजावला आहे. मुंबई हे जगातील सर्वोत्तम शहर आहे. त्यात सर्वांनी साथ दिली पाहिजे. मी मुंबईकरांना विनंती करते की त्यांनी मतदानाचा हक्क बजावावा”, असं हेमा मालिनी मतदानानंतर म्हणाल्या. मतदान हा आपला राष्ट्रीय हक्क आहे. मतदानाचा हक्क असलेल्या सर्वांनी मतदान करावं. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी खास मुंबईहून पुण्याला आलो आहे. उंच इमारती निर्माण होणं म्हणजे शहराचा विकास नसतो. शहरे संस्कृत आणि मोकळा श्वास घेणारी राहावीत. घटनेनं मतदान करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे, तो आपण पाळला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुबोध भावेनं दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >