मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले आहे. समुद्रातून येणाऱ्या महाकाय मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी आतापर्यंत डिझेलवर चालणाऱ्या 'टग बोटीं'चा वापर केला जात असे. मात्र, आता या कामासाठी अत्याधुनिक विद्युत बॅटरीवर आधारित (EV) टग बोटी तैनात केल्या जाणार आहेत. मुंबई बंदर प्राधिकरणाने ६० टन ओढण्याची क्षमता असलेल्या दोन विद्युत टग बोटींसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. समुद्रातील खडकाळ आणि अरुंद मार्गातून (चॅनल्स) मोठी जहाजे ओढून आणण्याचे काम या बोटी करतात. सध्याच्या डिझेल बोटींमुळे मोठ्या प्रमाणावर धूर आणि कार्बन उत्सर्जन होते. मात्र, एका इलेक्ट्रिक टग बोटीच्या वापरामुळे एका फेरीत सुमारे १५० टनांहून अधिक कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. देशातील पाच प्रमुख बंदरांना पर्यावरणपूरक बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रॅम' सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत २०३० पर्यंत प्रत्येक मोठ्या बंदरात किमान दोन टग बोटी (Tug Boat) या पूर्णपणे विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुंबई बंदराने हे लक्ष्य गाठण्यासाठी भाडेतत्त्वावर अशा बोटी घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हे तंत्रज्ञान भारतीय समुद्री क्षेत्रात एक क्रांती घडवून आणणार आहे. डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे इंधनावरील खर्च तर वाचणारच आहे, शिवाय समुद्रातील जलचरांना होणारा प्रदूषणाचा त्रासही कमी होणार आहे. मुंबई बंदराचे हे मॉडेल यशस्वी झाल्यास देशातील इतर बंदरांमध्येही जलद गतीने अशा इलेक्ट्रिक बोटींचा वापर वाढणार आहे.
मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (समर्पित माल वाहतूक मार्ग) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यासाठी मध्य रेल्वेने १८ जानेवारी ते १५ ...
६० टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक टग बोटींनी सजणार दोन्ही बंदरे
भारताच्या सागरी सीमांवरून होणारी मालवाहतूक आता अधिक पर्यावरणपूरक आणि आधुनिक होणार आहे. आतापर्यंत ८० ते १०० टन क्षमतेच्या अवजड डिझेल टग बोटींचा वापर करणाऱ्या भारतीय बंदरांमध्ये आता ६० टन क्षमता असलेल्या विद्युत बॅटरीआधारित (Electric Battery) टग बोटींची एन्ट्री होत आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) यापूर्वीच ६० टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक बोटी खरेदी केल्या असून, आता मुंबई बंदर प्राधिकरणानेही (MbPA) याच पावलावर पाऊल टाकत निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई बंदर आणि जेएनपीए हे दोन्ही आता ६० टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक श्रेणीत एकाच पातळीवर येणार आहेत. या आधुनिक बोटींमुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही, तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होईल. काही काळापूर्वीच माझगाव डॉकला सेवा देणाऱ्या कंपनीने ३० टन क्षमतेची अशा प्रकारची बोट घेण्याची तयारी दर्शवली होती, त्यानंतर आता देशातील मोठ्या बंदरांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. सध्या कार्यरत असलेल्या ८० ते १०० टन क्षमतेच्या डिझेल बोटी प्रचंड प्रदूषण करतात. मात्र, नव्या ६० टन क्षमतेच्या इलेक्ट्रिक बोटी कार्यक्षमतेत कोणत्याही प्रकारे कमी नसून त्या कमी खर्चात आणि अधिक शांततेत (Zero Noise Pollution) आपले काम पूर्ण करतील.
मुंबईत दिवसाढवळ्या 'धुरके'
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडी आणि उन्हाचा खेळ सुरू असतानाच, बुधवारी मुंबईकरांना एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागला. संपूर्ण शहरात सकाळपासूनच धुरक्याचे दाट साम्राज्य पसरले होते. विशेष म्हणजे दुपारच्या वेळीही हे धुरके कायम असल्याने दृश्यमानता (Visibility) कमालीची घटली होती. काही किलोमीटर अंतरावरच्या इमारती आणि रस्ते स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांनाही कसरत करावी लागली. बुधवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) ११८ इतका नोंदवला गेला. हा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत येत असला तरी, धुरक्यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याचे जाणवत होते. मुंबईतील हवेची दिशा सध्या पूर्व आणि आग्नेय पट्ट्यातून असल्याने जमिनीलगत धूळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वेकडून येणारे वारे आणि या स्थितीमुळे वातावरणाच्या वरच्या थरात उष्ण हवा साचली आहे. या उष्ण हवेने खालच्या थरातील थंड हवेला जणू 'लॉक' केले आहे. यामुळे जमिनीलगतचे प्रदूषण आणि धुलिकण वर जाऊ शकत नाहीत आणि हवेतच अडकून पडल्याने धुरक्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असतानाच, श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनाही याचा त्रास जाणवत आहे. वातावरणातील हा 'ट्रॅप' जोपर्यंत मोकळा होत नाही, तोपर्यंत मुंबईत असेच धुरकट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.






