Sunday, January 18, 2026

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेविका शाहू कांबळे यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. निवडणूक जिंकून अवघे २५ दिवस उलटले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

मंगळवारी पहाटे अचानक शाहू कांबळे यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तात्काळ त्यांना अहमदपूर शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेची वेळ असल्याने अनेक खासगी रुग्णालये बंद होती, तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तब्बल एक तास उपचारासाठी वणवण केल्यानंतर अखेर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुर्दैवाने, तोपर्यंत फार उशीर झाला होता. शासकीय रुग्णालयातही तातडीचे उपचार मिळण्यास विलंब झाल्याने शाहू कांबळे यांची प्राणज्योत मालवली. “१५ ते २० मिनिटे आधी योग्य उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता,” अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. शाहू कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. त्यांचा २०१७ च्या निवडणुकीत केवळ १२ मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यांनी जनसंपर्क आणि पक्षकार्य सुरूच ठेवले. यंदाच्या निवडणुकीत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत प्रचारात स्वतः लक्ष घातले आणि अखेर शाहू कांबळे मोठ्या फरकाने विजयी झाल्या.

लोकप्रतिनिधीच्या मृत्यूने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या दयनीय अवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळेवर उपचार मिळाले असते तर हा बळी टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >