Thursday, January 15, 2026

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई : महापालिका निवडणुकीत एकदा मतदान केल्यानंतर बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान केले जात असल्याच्या आरोपांनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी यासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरत संशय व्यक्त केल्याने राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. मतदान केल्यानंतर शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. वाघमारे म्हणाले, बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

पाडू यंत्र २००४ पासून वापरात

बोगस मतदानाबाबत आतापर्यंत आमच्याकडे एक तक्रार आली आहे, त्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाडू यंत्राबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून, पाडू हे यंत्र २००४ पासून वापरात आहे, ते नवीन नाही. ते अपवादात्मक परिस्थितीत, ईव्हीएम डिस्प्ले बंद पडल्यास वापरण्यात येते. आतापर्यंत ०.५ टक्के वेळाच हे यंत्र वापरण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment