Thursday, January 15, 2026

Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असतानाच, दक्षिण मुंबई आणि उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

मतदानादरम्यान काही राजकीय नेत्यांनी आणि विरोधकांनी 'मतदानाची शाई पुसली जात आहे' असा गंभीर आरोप केला होता. मात्र, निवडणूक प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीएमसी प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. माध्यमांमध्ये प्रसारित होणारे वृत्त हे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही." प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा

त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा....

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदान केले. मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी काही पत्रकारांनी विरोधकांच्या शाई पुसली जात असल्याच्या आरोपाचा उल्लेख केला. यावर बोलताना मुख्यमंत्र्‍यांनी कडक शब्दांत भाष्य केले. "निवडणूक निःपक्षपाती व्हायला हवी, पण प्रत्येक गोष्टीवर आरडाओरडा करून संशय निर्माण करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. स्वतःच्या बोटावरील शाई दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, "बघा, माझ्याही बोटाला शाई लावली आहे, ती पुसली जातेय का? विनाकारण प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही. जर कोणाला शाईबद्दल शंका असेल, तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. त्यांना वाटल्यास त्यांनी ऑईल पेंटचा वापर करावा, पण निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यात दुमत नाही." विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांवर निशाणा साधताना फडणवीस पुढे म्हणाले की, "निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता हवीच, परंतु केवळ गोंधळ घालण्यासाठी आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी प्रश्न उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे." निवडणूक आयोगाने या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती पडताळणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मलबार हिल, वांद्रे (पश्चिम), जुहू आणि कुलाबा यांसारख्या उच्चभ्रू भागांत मतदानाची गती अतिशय संथ आहे. सुट्टीचा आनंद घेण्याकडे या भागातील नागरिकांचा कल असल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येत आहे. यावर प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून, सोसायट्यांमधील मतदारांना बाहेर पडण्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन केले जात आहे.

नेत्यांनी मुंबईकरांना मतदानाचे आवाहन केले आहे. "ही निव्वळ सुट्टी नाही, तर शहराच्या विकासात सहभागी होण्याची संधी आहे. तक्रार करण्यापेक्षा आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी घराबाहेर पडा," असे आवाहन अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानानंतर केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >